Nashik Ramdas Athawale : आपल्या मिश्किल कवितांमधून विरोधकांवर बरसणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. औरंगाबाद (Aurangabad) नामांतर मुद्द्यावरून त्यांनी सरकारला शालजोडे दिले आहे. शहराची नावं बदलून शहराचा विकास होत नसतो,अशा शब्दात आठवले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. 


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील जैन धर्मियांच्या कलापुर्णम या तीर्थधाम असलेल्या मंदिरास भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नुकेतच केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांसह जिल्ह्यांची नावे बदलली. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. अशातच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री आठवले यांनी मात्र या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री आठवले म्हणाले कि, नाव बदलून शहराचा विकास होत नसतो, त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागतात, त्यातून विकास साध्य होत असतो, लोकांना तो विकास अपेक्षित आहे ना कि शहराची नावे बदलण्याचा विकास, अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. 


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले कि, सरकारच्या माध्यमातून विकास होतो आहे. नाव बदला अथवा बदलू नका. मात्र विकास महत्वाचा आहे. औरंगाबादचा विकास होतो आहे, मात्र दुसरीकडे उस्मानाबाद दुष्काळी भाग आहे. त्यामुळे या जिल्ह्यात जल संधारणाची कामे, उद्योग वाढीसाठीचे प्रयत्न सरकारने करणे आवश्यक आहे. नुसतं नाव बदलून विकास होत नाही, मात्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सर्व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विकास लवकरच होईल, अशी अशा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. 


आठवले यांची जैन मंदिरास भेट 


दरम्यान आज नाशिक शहरातील देवळाली कॅम्प येथील जैन धर्मियांच्या तीर्थधाम या मंदिरास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. कलापूर्णम जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी आठवले यांनी आवर्जून उपस्थिती लावली. हे मंदिर नाशिकच्या पर्यटनात भर घालणारे आहे. तब्बल साठ हजार चौरस फूट जागेमध्ये दोन मजली भव्य, तब्बल एक लाख टनापेक्षा अधिक मकराना संगमरवरी दगडात हे कलापूर्णम तीर्थ साकार झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षांपासून दीडशेहून अधिक कारागीर मंदिराच्या निर्मितीसाठी अविरत परिश्रम घेत होते. मुनिसुव्रत स्वामी यांची भव्यमूर्ती मुख्य गाभाऱ्यात असणार आहे, तर 360 अंशांमध्ये उर्वरित 23 तीर्थकारांचे दर्शन होणार आहे.