Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे, मागील दोन तीन दिवसांत नागरिकांवर हल्ल्याचे प्रकार देखील समोर आले आहे. अशातच नाशिकच्या आडगाव परिसरात बिबट्याने बंगल्यात उडी घेत शिरकाव केला. यावेळी कुत्र्याला भक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या कुत्रा थेट मदतीला धावला. दोन्ही कुत्र्यांना पाहून बिबट्याची देखील तंतरली. काही वेळ प्रतिकार करून बिबट्याने बंगल्यातून धूम ठोकली.
नाशिक (Nashik) शहरातील जय भवानी रोडवर तिनच दिवसांपूर्वी बिबट्याने (Leopard Attack) केलेल्या हल्ल्यात एक ईसम गंभीर जखमी झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयातही चांगलेच व्हायरल झाल्याने परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. दरम्यान, हा बिबट्या अजून वनविभागाच्या हाती लागलेला नसतांनाच आडगाव (Adgaon) परिसरातील पाझर तलाव परिसरात असलेल्या प्रभाकर माळोदे यांच्या मळ्यातील बंगल्यात काल रात्री बिबट्या शिरला होता. एका कुत्र्याला भक्ष्य करायला तो जाताच दुसरा कुत्रा त्याला वाचवायला आला आणि अखेर श्वानांचे हे चवताळेलेले रूप बघून बिबट्या पळून गेला. कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केल्याचीही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.
नाशिक शहरात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह (Leopard Sight) हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नाशिकच्या जेलरोड, देवळाली आदी परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आडगाव परिसरातील पाझर तलाव भागात प्रभाकर माळोदे यांचा बंगला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिबट्याने भिंतीवरून उडी घेत बंगल्यात प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच एक कुत्रा झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे बिबट्याने कुत्र्याची शिकार करण्याचे ठरविले. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करताच बाजूलाच दुसरा कुत्रा देखील झोपलेला होता. आवाजाने तो जागी झाला. मात्र, कुत्र्यांनी एकाचवेळी प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली. कुत्र्यांनी प्रतिकार करताना बिबट्याला सळो की पळो केले, अखेर काही मिनिटात बिबट्याने धूम ठोकली. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरातील आनंदनगर भागात रविवारी रात्री साडेनऊ वाजता इसमावर हल्ला चढवला. रस्त्याने जाणाऱ्या राजू शेख यांच्यावर बिबट्याने झेप घेत झडप (Leopard Attack) घातली. या हल्ल्यात शेख यांच्या डोक्याला जबर जखम झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेख हे भालेकर मळा येथील रहिवासी असून गुरुदेव गॅस एजन्सीमध्ये कामाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास राजू शेख रस्त्याने पायी जात असताना बिबट्याने प्रचंड वेगाने त्याच्यावर अचानक हल्ला केला.
नाशिकरोड परिसरात मुक्त संचार
जय भवानी रोडवरील आडके नगर भागात पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आर्टिलरी सेंटर रोडवरील गुलमोहर कॉलनीत रविवारी पहाटे बिबट्याने श्वानावर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तर काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामधून एक महिला देखील बचावली होती. त्यातच रविवारी पहाटे डॉ. कनोजिया यांच्या बंगल्याचे आवारातील एका क्षणावर बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले. रविवारी झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. वन विभागाने तातडीने याची दखल घेऊन पिंजरा लावावा तसेच बिबट्याला रेस्क्यू करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :