Igatpuri Jindal Fie : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीमध्ये (Jindal Fire) दि. 1 जानेवारी 2023 रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर तब्बल दीड महिन्यानंतर बुधवारी कंपनीतील 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आगीची मोठी भीषण घटना घडली. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) जवळील जिंदाल पॉलिफिल्म (Jindal Polyfilm) या कंपनीत ऑइल गळतीमुळे (oil Leak) भीषण आग लागली. आगीची दाहकता इतकी होती जवळपास 20 ते पंचवीस किलोमीटर वरूनही ही आग दिसत होती. या या घटनेत दोन महिलासंह एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अखेर या घटनेचा चौकशी अहवाल समोर आला असून या अहवालाच्या माध्यमातून हा प्लॅन्ट घटनेच्या दिवसांआधीपासून महिनाभर बंद होता. यातील ऑईलच्या गळतीमुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंपनीच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान 01 जानेवारी रोजी  इगतपुरी जवळील जिंदाल कंपनीमध्ये भीषण आगीची घटना घडली. या घटनेमध्ये कंपनीतील कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव व सुधीर लालताप्रसाद मिश्रा या तीन कामगारांचा मृत्यू तर 22 कामगार जखमी झाले होते. घोटी पोलिस स्टेशन येथे सदर घटनेबाबत अकस्मात मृत्यू तसेच भीषण आग दुर्घटनेची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आगीच्या घटनेची चौकशीसाठी पथक नेमण्यात आले. त्यानुसार पोलिसांसह ही चौकशी समितीने घटनेबाबत अहवाल तयार केला. जवळपास महिन्याहून अधिक काळ या अहवालासाठी देण्यात आला. त्यानंतर बुधवारी जिंदालच्या 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


जिंदाल कंपनीच्या आग दुर्घटनेनंतर चौकशी समितीने अहवाल दिला. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, नाशिक व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून अहवाल मागविण्यात आले होते. सेफ्टी ऑडिट रिपोर्ट व इतर कागदपत्रेही प्राप्त करण्यात आली होती. अवलोकन केल्यानंतर ज्या बॅच पॉली प्लांटमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लांट हा सुमारे दीड महिन्यापासून बंद होता. प्लांट सुरू करण्यापूर्वी तपासणी व दुरुस्ती होऊन, तो सुरू करताना एसओपीचे पालन न केल्याने प्लांटमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती झाली व त्यातून आग लागल्याचे निष्पन्न झाले.


सात जणांवर झाला गुन्हा दाखल


दरम्यान पोलिसांनी जिंदाल पॉली फिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटादार संजीव सक्सेना, फॅक्टरी मॅनेजर विद्याधर नरहरी मधुआल, पॉली फिल्म प्लॅट बिजीनेस हेड पंकज दंदे, पॉली फिल्म प्लॅन्ट प्रोडक्शन मॅनेजर अनिल कुमार, मेन्टेनन्स विभाग प्रमुख रविंद्रकुमार सुरेंद्रकुमार सिग, गजेंद्रपाल नेत्रपाल सिंग, राकेश राजकिरण सिंह, या सात जणांना जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.