Nashik Crime News : नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एकतर्फी प्रेमातून बहिणीला वारंवार प्रपोज करत लग्नासाठी तगादा लावत असल्याचा राग मनात धरून भावाने एका तरुणाची हत्या केली आहे. ही हत्या आरोपीने त्याचा मामा आणि जावयाच्या मदतीने केली आहे. यातच नाशिक शहरात गेल्या तीन दिवसात तीन खून झाल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील निलगिरी बाग परिसर एका हत्येच्या घटनेमुळे सध्या हादरून गेला आहे. विकास नलावडे या 25 वर्षीय तरुणाला मारहाण तसेच धारदार शस्त्राने वार करत त्याला जीवे ठार मारण्यात आले आहे. हे सगळं काही घडलं आहे ते एकतर्फी प्रेमातून. विकासचे त्याच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. यासाठी तो वारंवार तिचा पाठलागही करायचा, अनेक वेळा त्याने तिला प्रपोज करत लग्नाची मागणी देखील घातली होती. मात्र संबंधित तरुणी यासाठी तयार नव्हती. काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी विकासची समजूत देखील घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विकास काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हाच राग मनात धरत अपार्टमेंटच्या समोरच असलेल्या मैदानात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुलीचा भाऊ अमोल साळवे, मामा सुनील मोरे आणि जावई राहुल उजगीरे यांनी विकासला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तसेच धारधार शस्त्राने वार करत त्याला संपवले.


हत्येनंतर पोलिसांनी तात्काळ मुलीचा भाऊ अमोल आणि मामा सुनील मोरेला अटक केली आहे. तर जावई राहुल उजगिरे हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तिघांवर आडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीचे आणि विकासचे प्रेमसंबंध होते, त्यानंतर त्यांच्यात वाद झाले, अशी माहिती मयत विकासच्या भावाने एबीपी माझाशी बोलतांना दिली आहे.


Nashik Crime News : नाशिकमध्ये तीन दिवसात खुनाच्या तीन घटना 


नाशिक शहरात गेल्या तीन दिवसात तीन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. 20 फेब्रुवारीला शिवाजीनगर परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करत तिची हत्या केली, 22 फेब्रुवारीला चुंचाळे परिसरात नवऱ्याने बायकोच्या गळ्यात सुरा खूपसून खून करत स्वतःही फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. तर निलगिरी बाग परिसरात एकतर्फी प्रेमातून विकासला संपवण्यात आले. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून आधीच गुन्हेगारीने डोकंवर काढलेलं असतांना खुनाच्या या घटनांमुळे शहर हादरून गेलं आहे.