नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेर दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या पाठोपाठ अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याने बंडखोरी केल्याने महायुतीचं टेन्शन वाढल्याचं दिसून येत आहे. 


काही दिवसांपूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यासमोर समीर भुजबळ यांनी आव्हान निर्माण केले. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून आले. 


रंजन ठाकरेंनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज


या पाठोपाठ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रंजन ठाकरे हे अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. महायुतीने भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना उमेदवारी घोषित केली असताना रंजन ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर रंजन ठाकरेंच्या उमेदवारीने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने बंडखोरी केली आहे. रंजन ठाकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत


दरम्यान, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गिते (Vasant Gite) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपक उमेदवारी अर्ज भरल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते.   


आणखी वाचा


Sujay Vikhe : संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...