नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात नांदगाव विधानसभा मतदारसंघाची (Nandgaon Assembly Constituency) जोरदार चर्चा सुरु आहे. कारण माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची लढत महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याशी होणार आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक (Ganesh Dhatrak) यांना उमेदवारी दिली आहे. माझ्यासमोर समीर भुजबळ नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांचं आव्हान असल्याचे म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना टोला लगावला आहे.
समीर भुजबळ यांच्या काल झालेल्या सभेत नांदगांव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे हे दहशत पसरवित दादागिरी करत असल्याचा आरोप केला. समीर भुजबळांच्या सभेतच शिवीगाळाची कॉल रेकॉर्डिंग उपस्थितांना ऐकवण्यात आली. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलार यांच्यावर सुहास कांदे संतापल्याचे दिसून आले. आता यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुहास कांदे यांनी आरोप फेटाळला
व्हायरल व्हिडिओ आणि ऑडिओ फेक आहे. ऑडिओ प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. पोलीस तपास करतील. VI ॲपने आवाजाची कॉपी त्यांनी केली आहे, असे म्हणत सुहास कांदे यांनी आरोप फेटाळला आहे. तर विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. भविष्यात उर्वरित कामे आणि सिंचन हेच आमचे ध्येय आहे. तर भुजबळांचे आव्हान मानत नाही, असे म्हणत सुहास कांदे यांनी छगन भुजबळांवर बोलण्यास टाळले आहे. माझ्यासमोर समीर भुजबळ नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांचं आव्हान असल्याचे म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असे त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. शेखर पगार यांनी भाषण केल्यावर सुहास कांदेंनी तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते त्यांनी माईक समोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते. घाणेरड्या शिव्या आणि दमबाजी दिसून आली. तसेच, विनोद शेलार आणि समीर भुजबळ यांना शिव्या देण्यात आल्या. म्हणूनच भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीरने घेतली आहे. या क्लिप ऐकल्या तर का घेतली आहे हे सर्वांना समजेल. सामान्य जनता बोलू शकणार नाही असे आहे. पोलिसांनी आणि महसूल विभागाने कारवाई करायला पाहिजे. अधिकारी प्रेशर खाली काम करत आहे. निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. योग्य ती कारवाई केली पाहिजे. लोकांना भयमुक्त वातावरणात मतदान करू दिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी सुहास कांदेंवर निशाणा साधला.
आणखी वाचा