Hemant Godse on Chhagan Bhujbal : नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्टवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) इच्छुक होते. मात्र, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे महायुतीत हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी अखेरच्या क्षणी जाहीर करण्यात आली. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी हेमंत गोडसे यांचा निवडणुकीत पराभव केला. आता हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 


देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारीनंतर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. पक्षाने उमेदवारी माघारी घेण्याच्या सूचना केल्यानंतर ही अहिरराव यांची उमेदवारी कायम आहे. अहिरराव यांच्या उमेदवारीनंतर शिवसैनिक आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेनेने देवळाली विधानसभा मतदारसंघात मेळावा घेतला. या मेळाव्यातून हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर तोफ डागली.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ कुटूंबावर एवढे प्रेम का? 


हेमंत गोडसे म्हणाले की, महायुतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. सुरुवातीला दोन्ही बैठकांना आपण उपस्थित होतो. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्या, दोन-तीन दिवसांत माघारी झाल्या. महायुतीचे वरिष्ठ सांगतील तशी माघारी होतील असे वाटत होते, मात्र एबी फॉर्म असल्यानं काही माघारी झाल्या नाहीत. त्यावर चर्चा करण्यासाठी आजचा मेळावा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार देखील शिवसैनिकांना सुरू केला. आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी केली. मग शिवसेनेने युती धर्म पाळायचा का? राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ कुटूंबावर एवढे प्रेम का? विधान परिषदेत पंकज भुजबळ यांना संधी दिली. येवल्यात छगन भुजबळ आहे. नांदगाव मतदारसंघात आपल्या उमेदवारासमोर समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली. एवढे लाड का? असा हल्लाबोल हेमंत गोडसे यांनी भुजबळ कुटुंबीयांवर केलाय. 


माझ्या पाठीत खंजीर खुपसला


लोकसभामध्येही उमेदवारीला उशीर झाला. आता शिंदे साहेब आदेश देत नाही, तोपर्यंत कोणत्याच व्यासपीठावर जाऊ नये. लोकसभेत भुजबळ सांगत होते, माझी उमेदवारी केंद्रातून जाहीर झाली आणि नंतर बोलले, आता उशीर झाला, आणि ते रणांगण सोडून पळून गेले. शिवसैनिक पळून गेले नाही. लोकसभेमध्ये आपल्यासोबत राहिले आणि हातावर लिहिले 3 'वाजे' ला मतदान करा, आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला, असा हल्लाबोल देखील हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलाय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होवो, ही सर्वांची भूमिका आहे. दोन दिवसात मुख्यमंत्री आपली भूमिका जाहीर करतील, तोपर्यंत कोणी कुठेच जाऊ नका. आदेश आल्यावर रात्रंदिवस काम करू आणि उमेदवार जिंकून आणू, असेही हेमंत गोडसे म्हणाले.  


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Elections 2024 : ठाकरे गटातील नेत्याची राजेश टोपेंविरोधात बंडखोरी, शिवाजीराव चोथे अचानक भुजबळांच्या दरबारी; घडामोडींना वेग