नाशिक : नांदगावची (Nandgaon) लोकं दहशतवादाला खूप कंटाळले आहेत. भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी त्यासाठीच दिली आहे. सध्याचा नांदगावकरांचा कल समीर भाऊंच्या बाजूने झुकतो आहे. त्यामुळे त्यांचा विजय मला निश्चित वाटतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhhagan Bhujbal) यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असून दिवाळीचा सण देखील आहे. या निमित्ताने यंदाची दिवाळी नेमकी कशी छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, दिवाळीचा आनंद लहानपणी होता तो आता नाही. ज्या चाळीत मी राहिलो तिथे आम्ही दिवाळीत वेगवेगळे पदार्थ बनवायचो. आम्ही एकमेकांना फटाक्यांची देवाणघेवाण करून वाजवायचो. दिवाळी अंकात आम्ही वेगवेगळे विषय वाचायचो. आधीची दिवाळी आता राहिली नाही. सार्वजनिक गणपतीसारखी सार्वजनिक दिवाळी आधी आम्ही साजरी करत होतो, आता ती घरापुरतीच मर्यादित राहिली आहे. आता लहान-लहान मुलं फटाके फोडत असताना ते पाहायला खूप आनंद वाटतो. यंदाची दिवाळी फारच वेगळी आहे, निवडणुकीतील उमेदवारांना मला वाटत नाही दिवाळीचा आनंद घेता येईल, असे त्यांनी म्हटले.
पाच तारखेनंतर खरे राजकीय फटाके वाजतील
सर्व राजकीय पुढार्यांच्या घरी आता तेच सुरू आहे. कोणाची माघारी घ्यायची? निवडणुकीत काय करायचं? पूर्वी आम्ही दिवाळीचं कार्ड प्रत्येकाच्या घरी पाठवायचो, आता फक्त फोनवरच शुभेच्छा पाठवतो आणि एकमेकांची भेटही होत नाही. दिवाळी सण हा देशासह जगात साजरा व्हायला लागला आहे. अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये देखील दिवाळी साजरी होते. सर्व धर्मीयांमध्ये दिवाळी सण साजरा केला जातो. यंदाची दिवाळी इलेक्शन दिवाळी आहे. चार दिवस फक्त निवडणुकीवरच सर्वांच्या घरात चर्चा सुरू असतील. पाच तारखेनंतर खरे राजकीय फटाके वाजतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
निकालानंतर महायुतीसाठीच दिवाळी गोड असणार
आठवणीतली दिवाळी हीच होती की फुटलेले फटाके गोळा करून एकत्र करायचं आणि तो आनंद वेगळाच होता. राजकीय जीवनात देखील दिवाळी ही आनंदाची होती, आता दिवाळीचा आनंद हा स्वतःपुरताच उरलेला आहे. लहानपणीच्या दिवाळीचा आनंद आता संपलेला आहे. सध्या फक्त दिवाळीची औपचारिकता बाकी आहे. दिवाळीत नवीन कपडे आणि काहीतरी नवीन करायचं पण आता तसे उरले नाही. निकाल लागत नाही तोपर्यंत सर्वांसाठी दिवाळी गोड आहे. निकालानंतर महायुतीसाठीच दिवाळी गोड असणार हे शंभर टक्के आहे, असेही त्यांनी म्हटले.
नांदगावमध्ये जे घडलं ते समीर भुजबळ यांच्या फायद्याचेच
नांदगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, समीर भुजबळ जरी अपक्ष उमेदवार करत असेल तरी कुटुंब म्हणून आम्ही उद्या लक्ष्मीपूजनासाठी एकत्र येणार आहोत. निवडणुकीत शिव्या आणि दादागिरी केली तर कायदा आपलं काम करेल. नांदगावमध्ये जे घडलं ते समीर भुजबळ यांच्या फायद्याचेच असणार आहे. समीर भुजबळ यांना उभे राहण्याआधी मी सांगितलं होतं की, राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल. समीर भुजबळ यांनी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला.
नांदगावकरांचा कल समीर भाऊंच्या बाजूनं
नांदगावची लोकं दहशतवादाला खूप कंटाळले आहेत. भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीर भुजबळ यांनी त्यासाठीच दिले आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओमुळे जगासमोर आली आहेत की, नांदगावमध्ये किती दहशत आहे. सध्याचा नांदगावकरांचा कल समीर भाऊंच्या बाजूने झुकतो आहे. त्यामुळे त्यांचा विजय मला निश्चित वाटतो आहे, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.
आणखी वाचा
समीर भुजबळांना देखील घड्याळाची निषाणी देता आली असती, पण....नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?