नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच दिंडोरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल आहेत. तसेच माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे महायुतीचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


शिवसेना शिंदे गटाने देवळालीमध्ये राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. दिंडोरीतून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात माजी आमदार धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांच्या विरोधात माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र राजश्री अहिरराव आणि धनराज महाले नॉट रिचेबल असल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. कोणत्याही परिस्थितीत मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, मी निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.


नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? 


त्यामुळे छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करून समीर भुजबळ यांचा अर्ज मागे घ्यावा, अशी अपेक्षा महायुतीकडून व्यक्त केली जात असताना छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर निवडणूक लढवित आहेत. आम्ही त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. घड्याळ चिन्हावर समीर भुजबळ निवडणूक लढत नाहीये, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर समीर भुजबळ निवडणुकीतून माघार नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघाबाबत भुजबळ म्हणाले की, ज्यांना उमेदवारी दिली, जे नॉट रीचेबल आहेत त्यांनी निर्णय घ्यावा. महायुतीच्या जागा वाटपाबाबत मुंबईमध्ये बसलेले वरिष्ठ निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या