नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Assembly Constituency) दोन बडे नेते निवडणुकीतून माघार घेणार आहेत. यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीने भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना उमेदवारी घोषित केली असताना रंजन ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. रंजन ठाकरेंच्या उमेदवारीने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली होती. तर मनसेकडून जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मनसेच्या उमेदवारीमुळे भाजप आमदार देवयानी फरांदे यांना फटका बसणार, असे बोलले जात होते.
रंजन ठाकरे माघार घेणार
आता नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे माघार घेणार आहेत. रंजन ठाकरे दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. महायुतीमधील मतविभाजन टाळण्यासाठी वरिष्ठांच्या सुचनेनंतर रंजन ठाकरे यांच्या माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर अंकुश पवार घेणार माघार
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अंकुश पवार हे देखील माघार घेणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंकुश पवार यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर अंकुश पवार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. मनसेचा कल महायुतीच्या बाजूने असल्याने देवयानी फरांदे यांना फायदा होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या