नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी (NCP Candidate List) जाहीर केली. या यादीत निफाडच विद्यमान आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांच्या नावाचा समावेश नाही. त्यातच आता भाजप नेते यतीन कदम (Yatin Kadam) यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. यतीन कदम शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर रवाना झाले झाले असून त्यांचे समर्थक अजित पवारांच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून बसले आहेत.


निफाड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. दिलीप बनकर हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत दिलीप बनकर यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे निफाडची जागा भाजपला सुटावी किंवा सक्षम उमेदवार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी यतीन कदम आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.


क्विक सर्व्हेतून ठरणार उमेदवारी


यतीन कदम अजित पवारांच्या भेट घेणार आहेत. या जागेचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार यांनी क्विक सर्व्हेचा प्रयोग केला आहे. यतीन कदम आणि दिलीप बनकर यांच्यात क्विक सर्व्हे केला जाणार आहे. क्विक सर्व्हेत जो पुढे असेल त्याला उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. आता या क्विक सर्व्हेत काय समोर येणार? निफाडमधून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  


नांदगावमध्ये महायुतीत घमासान 


दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीत घमासान पाहायला मिळत आहे. कारण महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाची आहे. विद्यमान आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार समीर भुजबळ हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. समीर भुजबळ हे 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे. समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.


आणखी वाचा 


मोठी बातमी : लोकसभेला सर्व्हेच्या नावे जागा सोडल्या, पण आता नाही, एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका, महायुतीत 30 जागांवरुन रस्सीखेच