नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघाची (Nandgaon Assembly Constituency) जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  


आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) येवला विधानसभेसाठी (Yeola Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर समीर भुजबळ हे 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे. समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 


ते स्वतःचा निर्णय घेण्यासाठी निर्णयक्षम


याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, समीर भुजबळ महाविकास आघाडीकडून लढणार हे कधी बोलले. तुतारीकडे जाणार कधी म्हणे मशालकडे जाणार ही चर्चा तुम्हीच केली होती तो आहे तिथेच आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तो उपस्थित राहणार आहे. तो अपक्ष लढणार हे मला सांगितले नाही. तुम्हाला कसे सांगितले मला कल्पना नाही. आता ते स्वतःचा निर्णय घेण्यासाठी निर्णयक्षम आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


महायुतीचं शासन पुन्हा एकदा येईल : छगन भुजबळ


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, महायुती आणि आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने आदेश दिल्याने मी पुन्हा निवडणुकीला उभे राहिलो आहे. मी 1985 पासून विधानभवनात आहे. तुमच्या आशीर्वादाने आणखी पाच वर्ष बसणार आहे. नेहमीच्या निवडणुकीमध्ये थोडी स्पष्टता असायची कोण कुठे आहे? आता मात्र अजून मला कळत नाही कोण कुठे आहे ते. कोण कुठून उभा राहतोय, काहीच समजत नाही. लोकसभेच्या वेळी महायुतीला फार मोठा सेटबॅक बसला.  मात्र नंतरच्या काळात महायुतीने फार मोठी आघाडी घेतलीय. आता आमची खात्री झाली आहे की, महायुतीचं शासन पुन्हा एकदा येईल. 


मी कुणालाही शत्रूपक्ष समजत नाही : छगन भुजबळ


येवला मतदार संघातील रस्त्याचा, पाण्याचा प्रश्न सुटलाय. विकास कामं झाली आहेत. आमच्या पक्षाने मला सांगितलंय की, परत तुम्हालाच उभं राहायचंय.  येवला-लासलगाव मतदार संघातील नागरिकांचा देखील आग्रह आहे. त्यामुळे मी फॉर्म भरतोय.  कोणीही जरी आलं, तरी एक विरोधी पक्ष म्हणून आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. मी कुणालाही शत्रूपक्ष समजत नाही, विरोधी पक्ष असतात. लोक ज्या कुणाला निवडून देतील त्याने लोकांची काम करायची. मला काम करण्याची लहानपणापासून सवय आहे. महिनाभर मला वाटत नाही, मला काही काम आहे. आता एकदा फॉर्म भरायला जाऊ आणि नंतर शेवटी भाषण करायला जाऊ, असे त्यांनी म्हटले.  


आणखी वाचा


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आरएसएसचा 288 जागांचा सर्व्हे, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, विधानसभा निवडणुकीत काय होणार?