नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहेत. त्यातच राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरु आहेत. आता शिवसेना शिंदे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर (Nashik Central Assembly Constituency) दावा केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


सोमवारी संजय शिरसाट हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी आयोजित केलेल्या ढोलताशा महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलं. अजय बोरस्ते आमच्यासोबत विधानसभेत दिसतील, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवण्यास तयार : अजय बोरस्ते  


नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे (Devyani Pharande) या सलग दोन टर्मपासून आमदार आहेत. मात्र आता संजय शिरसाट यांनी अजय बोरस्ते यांचे नाव जाहीर केल्याने महायुती मिठाचा खडा पडण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. याआधी अजय बोरस्ते हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अजय बोरस्ते यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. पक्षाने संधी दिल्यास नाशिक मध्य विधानसभेतून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे अजय बोरस्ते यांनी म्हटले आहे. आता नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


महायुतीत सर्वांना सामावून घेतले जाईल : संजय शिरसाट 


दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागावाटपात सन्मानजनक जागा देण्याचा शब्द अमित शाहांनी दिल्याचे समजते. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, कोणी किती जागा लढवायच्या याचा आढावा घेण्यात आला आहे. अजून जगावाटपाचा निर्णय झालेला नाही. आमच्यात कुठलाही तेढ नाही. आमच्या तिघांची कोअर कमिटी आहे, ते निर्णय घेतात. महायुतीत सर्वांना सामावून घेतले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.