नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. सध्या विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावर (Seat Sharing) चर्चा सुरु आहे. मात्र नाशिकच्या (Nashik) जागांवरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरु आहे. नुकतीच नाशिकच्या जागांवरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून आले. या पाठोपाठ आता महाविकास आघाडीतदेखील नाशिकच्या जागांवरून संघर्ष होणार असल्याचे दिसून येत आहे.   


जिल्ह्यातील 10 जागांवर शरद पवार गटाचा दावा 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवर दावा ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वाटपावर महाविकास आघडीचे मुंबईत बैठकांचे सत्र सुरू असताना नाशिकमध्ये मात्र रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 10 जागा लढण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठाम आहे. शिवसेना ठाकरे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गिते आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची नावे विधानसभेसाठी निश्चित केली आहेत. मात्र, शरद पवार गटाने या दोन्ही जागांवर आपला दावा सांगितला आहे. 


राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत तणाव? 


शहरातील 3 पैकी 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढण्याच्या तयारीत आहे.  23 सप्टेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन स्वराज्य यात्रा तीन दिवस नाशिकमध्ये येणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात वाद उद्भवणार असल्याचे दिसून येत आहे. आता नाशिकमधील जागा महाविकास आघाडीत नेमक्या कुणाच्या वाट्याला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


महायुतीत मिठाचा खडा 


दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी आयोजित केलेल्या ढोलताशा महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. अजय बोरस्ते आमच्यासोबत विधानसभेत दिसतील, असे त्यांनी म्हटले होते. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच जागांवर तयारी असल्याचा इशाराच भाजपने शिवसेनेला दिला आहे. वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे आमची सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं पुढे सरकलं, 168 जागांचा तिढा सुटला, 'या' फॉर्म्युल्यानं सुटलं राजकीय गणित