मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यातच आता महायुतीत 288 पैकी 168 जागांवर जागा वाटपाचा (Mahayuti Seat Sharing) कोणताही वाद नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत 288 पैकी 168 जागांवर जागा वाटपाचा कोणताही वाद नसल्याची माहिती मिळत आहे. 168 मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांपैकी एकाच पक्षाने त्या त्या जागेवर दावा केल्याने या 168 जागेवरच जागावाटपाचा तिढा सुटला आहे.  यातील बहुतांश जागा सीटिंग-गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


89 जागांचा तिढा कधी सुटणार?


तर 2019 मध्ये पक्षाने जागा जिंकली. मात्र, आमदार शरद पवार गटात किंवा उद्धव ठाकरे गटात आहे, अशा सीटिंग जागा व महायुती समर्थित अपक्षांच्या जागा मिळून जवळपास 31 जागांवरचा पेच निकाली निघाला आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे समजते. तर उर्वरीत 89 जागांवर निवडून येण्याची क्षमता या निकषावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. आता 89 जागांचा तिढा नेमका सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


कोकणातल्या तीन जागांवरून मविआत रस्सीखेच


तर, महाविकास आघाडीत कोकणातल्या तीन जागांवरून रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांवर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. चिपळूण, सांवंतवाडीवर शरद पवार गटाचा दावा तर राजापूरसाठी काँग्रेस आग्रही आहे. सावंतवाडी, राजापूरची जागा ठाकरे गट हातची जाऊ देणार का? असा सवाल उपस्थित होत असून जागा सोडवून घेऊ, असे आश्वासन काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना दिले आहे. सावंतवाडीत शरद पवार गटाच्या अर्चना घारे यांच्याकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी असून आहे. ही जागा आपल्यालाच मिळणार असे आश्वासन वरिष्ठांनी दिल्याची माहिती अर्चना घारे यांनी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे. माजी आमदार सुभाष बने मुलाला तिकिट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. तर या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव देखील इच्छुक आहेत. आता महाविकास आघाडीत या जागांचा तिढा कधी सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


जागा वाटपाच्या चर्चेसाठी मविआची आज बैठक


दरम्यान, महाविकास आघाडीच्या ‌जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज बैठक होणार आहे. विद्यमान आमदार आणि मोठ्या नेत्यांचे जवळपास 120 मतदारसंघाच्या जागा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज उरलेल्या जागांबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. ज्या ठिकाणी दोन पक्षांचा दावा आहे आणि काही ठिकाणी तीन पक्षांचा दावा आहे अशा मतदारसंघात दोन टप्प्यात चर्चा होणार आहे.  


आणखी वाचा


एखाद्या आमदाराचा निगेटिव्ह सर्व्हे आला तर दुसऱ्या उमेदवाराला संधी; जागावाटपावर महायुतीची दोन दिवसीय बैठक