अयोध्या : अयोद्धेतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) नाशिक दौऱ्यावर (Nashik News) येणार आहेत. नाशिक दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिप्राचीन काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी निंमत्रण देण्यत आले आहे. नाशिक दौऱ्याचे औचित्य साधून या काळात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. काळाराम देवस्थानाचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी ही माहिती दिली आहे.
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे सांगतात. त्यामुळे श्रीरामांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. याबाबतची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे श्री काळाराम मंदिर प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता. त्यामुळे या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अयोध्येतील राम मंदीर लोकार्पण सोहळ्या आधी मोदींनी अतिप्राचीन काळारामचे दर्शन घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या आधी मोदी नाशिक दौऱ्यावर आलेत मात्र काळारामचे दर्शन न घेताच माघारी फिरले. त्यामुळे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा नाशिकमधे येणार आहेत त्या दिवशी त्यांनी काळारामचे दर्शन घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार
12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येण्याची शक्यता आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळावाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या महोत्सवाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्या निमित्ताने प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. राष्ट्रीय युवक मेळावासाठी जागेचा शोध सुरू आहे. या युवक मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक युवक येण्याची शक्यता आहे.
काय आहे मंदिराची आख्यायिका?
साधारण काही वर्षांपूर्वी या परिसरात नागपंथीय साधू वास्तव्यास होते. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या. त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे 1780 मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. 1790 मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी 23 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगतात.