Nashik News : मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) म्हटली की, पतंग (Kite) उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Nashik City Police Commissioner Sandeep Karnik) यांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरावर बंदी घातली आहे.


मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन आणि काचेच्या कोटिंगचा असतो. यामुळे पक्षी, प्राणी, नागरिक अनेकदा जखमी होतात. नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे गेल्या काही दिवसांत दुचाकीस्वार व सायकलवरील विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर काही जणांचा मंजामुळे मृत्यूदेखील झाला आहे. 


पर्यावरणाच्या दृष्टीने घातक (Nylon Manja is environmentally harmful)


तसेच नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे घर्शन होऊन आग लागून वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकारही घडतात.घरातील इलेक्ट्रिक उपकरणांनाही बाधा पोहोचते. नायलॉन मांजाचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे. नायलॉन मांजा लवकर तुटत नाही. तसेच त्याचा नाशही होत नाही.


मांजाची निर्मिती, विक्री, खरेदी, वापरावर प्रतिबंध


त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नागरिकांचे जीविताचे संरक्षण व्हावे तसेच नायलॉन मांजाच्या वापरामुळे अपघात प्रमाणास  प्रतिबंध व्हावा. यासाठी तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता नायलॉन मांजावर व ज्या मांजावर काचेचे धारदार व टोकदार कोटिंग केलेले आहे, अशा मांजाची निर्मिती, विक्री खरेदी व वापर आदींवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिल्याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे.


...तर होणार कारवाई


नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दि.२३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा विक्री व वापरावर मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास तडीपार, हद्दपार व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


आणखी वाचा