Nashik Weather News : नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत काहीअंशी थंडीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात 26 डिसेंबरला नाशिकमध्ये किमान तापमान 12. 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. ते मंगळवारी (दि. ०२) 14.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दरम्यान जानेवारीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मध्यम थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशकात गारठा कमालीचा वाढला होता. शहर व ग्रामीण भागात दिवसभर ढगाळ हवामानासोबत थंडी जाणवत होती. त्यामुळे नागरिकांनी दिवसभर उबदार कपडे परिधान केल्याचे दिसून येत होते. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्याचे पहायला मिळाले. 


नाशिक @14.5, निफाड @12.8


नाशिकला मंगळवारी किमान 14.5 अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली आहे. तर सोमवारी कमाल 30.4 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी किमान तापमान 16.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर निफाडला मंगळवारी 12.8 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात निफाडला 8.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. हे तापमान महाराष्ट्रातील यंदाचे निचांकी तापमान ठरले होते.


नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मध्यम थंडी


बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर या तीनही महासागरांच्या भूपृष्ठ पाण्याचे तापमान ३० अंशांवर पोहोचले आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा १ ते २ अंशांपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जानेवारीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मध्यम तर मध्य महाराष्ट्रात सौम्य थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता


प्रशांत महासागराचे तापमान मात्र दोन अंशांनी वाढून पुन्हा कमी झाले आहे. आग्नेय दिशेकडून वारे वाहून येत आहेत. बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. उत्तरेतील अतिशीत वाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. अंशतः ढग घोंगावत आहेत. जानेवारीतही असेच वातावरण राहणार आहे. जानेवारीत उत्तरेतील अतिशीत वाऱ्यांचा वेग वाढून तापमान नीचांकी पातळीवर घरसून थंडी वाढते. यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरणार आहे. उर्वरित समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने तिकडे वारे वाहून जाण्याऐवजी मध्य महाराष्ट्रावर ते जमा होते. त्यात उत्तरेऐवजी आग्नेयकडून उष्ण वारे वाहत आहे. त्यामुळे एक ते दोन अंश सेल्सिअसने कमाल व किमान तापमान वाढून मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


राज्याला पुन्हा अवकाळीचा धोका


राज्यात अनेक भागात पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे, तर दिवसा तापमानात वाढ झाल्याचेही चित्र आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Truck Driver Strike LIVE: राज्यात इंधन तुटवडा उद्भवणार? हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस, राज्यात अनेक पंपांवर रांगा