Nashik News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा नाशिक, ठाणे आणि पालघर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची (Rain) इशारा हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिक (Nashik), ठाणे (Thane), पालघरला (Palghar) वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज आहे. पुढील 3-4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी प्रति तासासोबतच काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज
या सोबतच नगर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील ३-४ तास अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील ३-४ तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नांदगावमध्ये गारपिटीमुळे 100 पोपटांचा मृत्यू
शनिवारी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे 100 हून अधिक पोपटांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक पोपट गंभीर जखमी झाले. या सर्व पोपटांचे वास्तव्य पोखरी येथील एका पिंपळाच्या झाडावर होते. या झाडावर नेहमीच पोपटांचा किलबिलाट असायचा. आता मात्र किलबिलाट पूर्ण थांबला आहे.
सिन्नरमध्ये अवकाळीने मोठं नुकसान
सिन्नर शहरासह तालुक्यातील डुबेरे, मनेगाव परिसरातही शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या. तसेच , पुर्व भागातील पांगरी, वावी, शहा, पंचाळे परिसरातही विजांचा कडकडाट सुरु होता. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. नांदुरशिंगोटे, दोडी, दापुर परिसरातही काही भागात पावसाच्या सरी बसरल्या. तालु्क्यातील सरदवाडी, पास्ते, जामगाव परिसरात जोरदार पावसासह गारा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरदवाडी, पास्ते परिसरात मुबलक पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बाग आहेत. या गारांचा फटका बागांना बसण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा