Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभेचा तिढा महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अद्याप सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे. त्यांनी याआधी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. मात्र अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने हेमंत गोडसेंची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे.
नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जात असल्याची चर्चा असल्याने हेमंत गोडसे आणि नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी नाराज होते. त्यामुळे हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा ठाणे गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा नाशिक लोकसभेचा आढावा घेतला आहे.
एकनाथ शिंदेंचं हेमंत गोडसेंना मोठं आश्वासन
या भेटीत नाशिकची जागा आपल्याकडेच राहील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र नाशिकच्या जागेची घोषणा नक्की कधी होणार? आणि ही जागा कुणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरु असल्याचीही चर्चा आता होत आहे.
श्रीकांत शिंदेनी केली होती हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभेचे (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. श्रीकांत शिंदेंच्या घोषणेचा महायुतीतून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मला दिल्लीतून सूचना आल्याचे म्हणत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होते.
नाशिकमधून पर्यायी उमेदवारांची चाचपणी
तसेच नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये भाजपची अधिक ताकद असल्याचे म्हणत नाशिक लोकसभेवर दावा केला होता. महायुतीच्या तीनही पक्षाकडून जागेवर दावा करण्यात आल्याने नाशिकचा तिढा अजून सुटलेला नाही. आता छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्या नावाला विरोध वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. यात भाजपचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नाव आघाडीवर आहे. आता नाशिकमधून कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा