Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. तसेच नाशिकच्या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मला दिल्लीतून सूचना आल्याचे म्हणत नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. तसेच भाजपने (BJP) नाशिकमध्ये आमची अधिक ताकद असल्याचे म्हणत नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे.
नाशिकच्या जागेबाबत वंचितची 'वेट अँड वॉच' भूमिका
वंचित बहुजन आघाडीने दिंडोरी लोकसभेची उमेदवारी जाहीर नुकतीच जाहीर केली. मात्र नाशिकचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही. नाशिकच्या जागेबाबत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) 'वेट अँड वॉचची' भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
प्रकाश आंबेडकर नाशिकच्या जागेचा पत्ता कधी खोलणार?
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने विजय करंजकर यांचा पत्ता कट करून अचानक राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विजय करंजकर नाराज आहे. तर दुसरीकडे महायुतीत हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचितने अजूनही उमेदवार जाहीर केला नसल्याचे समजते. वंचितचा नाराज उमेदवारांवर डोळा असण्याची शक्यता आहे. ऐनवेळी एखाद्या नाराज उमेदवाराला तिकीट देत वंचित बहुजन आघाडी मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नाशिकच्या जागेचा पत्ता कधी खोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या जागेबाबत वंचित भूमिका महत्वाची ठरणार
नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी 2019 मध्ये सलग दुसर्यांदा विजयी होऊन नाशकात पुन्हा निवडून न येण्याची मालिका खंडित केली होती. त्यांना 5, 63, 599 मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. त्यांना 2,71, 395 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना 1, 34, 527 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना 1, 09, 981 मते मिळाली होती. त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत वंचित एक महत्वाचा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठामच! अजित पवारांचं नाव घेत केला मोठा दावा