नाशिक : अवकाळीमुळे पावसामुळे (Unseasonal Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी किमान 50 हजारांची तात्काळ मदत करा, शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार हिवाळी अधिवेशन (Winter Session) चालू देणार नाही असा थेट इशारा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सरकारला दिला आहे. कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शेतीच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाचे नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले आहेत. नाशिकच्या (Nashik) इगतपुरी तालुक्यात विनायक राऊत, नितीन बानगुडे पाटील यांच्यासह नाशिकच्या ठाकरे गटाचे इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. पिक विमा कंपन्यांकडूनही मदत मिळत नाही, गेल्या वेळेच्या गारपीटीची देखील मदत सरकारने केली नाही, शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडून सरकार बाहेर मौज मजा करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी यावेळी एबीपी माझाशी बोलतांना केला आहे. 


अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता तोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. पण, तेलंगणामध्ये जाऊन लोचत गिरी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकरी टाहो फोडतो आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, पण तसे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार अधिवेशन चालू देणार नाही, असे राऊत म्हणाले. 


मिंधे सरकारकडून पोलिस बळाचा वापर... 


दरम्यान ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, सत्तेचा माज आलेल्या मिंधे सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात त्याप्रमाणे कारवाई करत दळवी यांना पकडले.  पण याचवेळी सुर्वे आणि सरवणकर यांच्या कृत्याचे काही नाही. सारवणकर यांनी गोळीबार केल्याचा रिपोर्ट आला तरीही त्यांच्यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. 


भुजबळांवर टीका...


मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण करण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रातले मंत्री व्यासपीठावर येऊन विसंवाद निर्माण करत आहे हे योग्य नाही. मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन शड्डू ठोकणे योग्य नाही. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून हे होत असल्याचा संशय आहे. पण राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल मला कौतुक वाटत आहे. त्यांनी भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट बोलून धारिष्ट्य दाखवले ते मुख्यमंत्री यांनी दाखवायला पाहिजे. समाजात भांडण लावले जात असल्याचे देखील विनायक राऊत म्हणाले. 


गद्दार गट भाजपच्या इशाऱ्यावर चालतोय...


राज्यातील सत्ताधारी पक्षातील गट तटाच्या राजकारणावर देखील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "गद्दार गट भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहे. अजित पवार आणि शिंदे गट इतर राज्यात जाऊन प्रचार करतात.  लोकांनी तिथं देखील यांचा धिक्कार केला असल्याचे,” राऊत म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Unseasonal rain : अवकाळी पावसामुळे दोन लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान, तात्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश