नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. आज नाशिक शहरासह दिंडोरीत (Dindori) तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथील डाळिंब बागेत पाणी साचल्याचे दिसून आले. पहिल्याच पावसाने दिंडोरीत पूर सदृश्यस्थिती पाहायला मिळाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी सुखावला आहे. तासाभराच्या पावसाने दिंडोरीत 1.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नाशिक शहरासह दिंडोरी तालुक्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासहा धो धो पाऊस (Nashik Rain Update) बरसला. पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.तर दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील रणतळे जवळ झाड रस्त्यावर पडून काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी झाड बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आज झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. तथापि काल मृग नक्षत्रास प्रारंभ होत असल्याने वातावरणात बदल होवून मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. दिंडोरी शहरासह खतवड, आंबेदिंडोरी, तळेगाव दिंडोरी, जानोरी, जऊळके, खेडगाव, बोपेगाव, पालखेड बं., वलखेड, निळवंडी, पाडे, मडकीजांब, वनारवाडी, ननाशी या भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
'या' भागात पावसाचा येलो अलर्ट
दरम्यान, पुढील 48 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल.