Girish Mahajan: आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात (Tapovan) साधुग्राम उभारण्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला (Nashik Tree Cutting) पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे. पुण्यातील श्रीराम पिंगळे यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली असून 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आज नाशिकमध्ये (Nashik News) 15 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), पर्यावरण प्रेमी, साधू-महंतांच्या उपस्थितीत मखमलाबाद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर नाशिक शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाणार असून 'हरित नाशिक'च्या संकल्पनेअंतर्गत नाशिककरांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी गिरीश महाजन म्हणाले की, आज आपल्यासाठी महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून वृक्षांचा विषय हा चर्चेचा विषय होता. आता आपण वृक्षारोप अॅप तयार केले आहे. मागील कुंभमेळा काळात जशी व्यवस्था होती, तशीच व्यवस्था केली जाणार आहे. एकही नवीन राहुटी लावली जाणार नाही. मागील काही दिवसात तिथे झाडे, झुडुपे वाढलेली आहेत, ती तोडण्याचा विषय होता. मात्र, माझे कार्टून बनविण्यात आले. मला लाकूड तोड्या म्हटले गेले. पर्यावरण प्रेमी, काही राजकीय संघटना यात उतरल्या. पण, मला त्याबाबत बोलायचे नाही.
Girish Mahajan: 15 हजार काय 25 हजार झाडे लावू
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, साधू गांजा पितात, असे जे बोलतात ते बोलणे योग्य नाही. नगरपालिका निवडणुकीनंतर मी झाडे बघण्यासाठी गेलो. ही सर्वांची जबाबदारी आहे. एक झाड आईच्या नावावर लावा, असे आवाहन मोदींनी केले होते. अजूनही कुठे जागा असेल तर तिथं ही झाडे लावू. 15 हजार काय 25 हजार झाडे लावू. मी आमदार, नगरसेवकांना सांगितले की, तुम्ही जागा सांगा आपण झाडे लावू. ही झाडे सीएसआर फंडमधून लावली जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
Girish Mahajan: आता तुम्ही सांगाल तेवढे झाडे लावणार
आमच्यावर आरोप करू नका. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असे आरोप केले, असे पाप कोण करणार? असे म्हणत गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मागील कुंभमेळ्यामध्येही तुम्ही माझे काम बघितले आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. विविध संस्था, संघटना वृक्षारोपणात सहभागी झाल्या आहेत. आता तुम्ही सांगाल तेवढे झाडे लावणार आहोत. तुम्ही नाशिककर म्हणाल की, आता बस झाले. पण आम्ही थांबणार नाही, असे देखील गिरीश महाजन म्हणाले.
आणखी वाचा