Continues below advertisement

Nashik Crime : नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील (Makhmalabad Road) महादेव कॉलनी परिसरात सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने पोटात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) चौघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्श नितीन कामे (वय 21, रा. कुमावतनगर, पूनम किराणाशेजारी, पंचवटी) हा युवक या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अमोल धनराज कुमावत (वय 37, रा. सप्तशृंगी निवास, कुमावतनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Continues below advertisement

Nashik Crime : किरकोळ कारणावरून वाद

तक्रारीनुसार, 12 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनीतील मनोहर अपार्टमेंट येथे मवर कुमावत यांचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अमोल कुमावत व स्पर्श कामे हे नाचत असताना स्पर्शचा चंद्रभान गणपत चोथवे याला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांत वाद निर्माण झाला.

Nashik Crime : “तुझा मर्डर करून टाकतो”

वादानंतर चंद्रभान चोथवे याने सुमित बोडके व इतर दोन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सुमित बोडके याने “तुझा मर्डर करून टाकतो” अशी धमकी देत स्पर्श कामे याच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात स्पर्श कामे गंभीर जखमी झाला. भांडण सोडविण्यासाठी अमोल कुमावत मध्ये पडले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत “तुम्हालाही बघून घेऊ” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Nashik Crime : एका आरोपीला अटक

घटनेनंतर जखमी स्पर्श कामे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सुमित बोडके, चंद्रभान गणपत चोथवे (23, रा. क्रांतीनगर, तरसे चाळ, मखमलाबाद रोड) तसेच त्याच्या दोन साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यातील चंद्रभान चोथवे याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. लग्नसोहळ्यासारख्या आनंदाच्या कार्यक्रमाला हिंसक वळण लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: आधी धमक्या नंतर वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावलं अन्...; प्रियकरानं प्रेयसीच्या नवऱ्याला क्रूरपणे संपवलं; घटनेनं जेजुरी हादरलं

Video : जीवाची पर्वा न करता हल्लेखोराला एकट्यानं लोळवलं, दहशतवाद्याकडून रायफल हिसकावली अन्...;  सिडनीमधील रियल हिरोचं जगभर कौतुक