Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून या जागेवर दावेदारी करण्यात आली आहे. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले असून दुसरीकडे उमेदवारी जाहीर झालेली नसताना विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर तिसरीकडे भाजपनेदेखील (BJP) या जागेसाठी आग्रही मागणी केली आहे. 


याबाबत गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, सगळ्यांनाच वाटतंय की, नाशिकची जागा आपल्याला मिळावी. शिवसेनेची सीटिंग जागा आहे, राष्ट्रवादीला वाटतय की, ही जागा त्यांना मिळावी. आमचे नाशिकमध्ये तीन आमदार, जवळपास ७० नगरसेवक आहेत. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


मित्रपक्षाला काही हक्काच्या जागा द्याव्या लागणार


ते पुढे म्हणाले की, शेवटी महायुती आहे, जागेच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहेत. मित्रपक्षाला काही हक्काच्या जागा द्यावा लागणार आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात चर्चा सुरु आहे. जागा वाटपाचा सगळा निर्णय दिल्लीला पार्लमेंटरी बोर्ड घेईल, असे वक्तव्य गिरीश महाजनांनी केले आहे.  


एक-दोन दिवसात अंतिम यादी येईल


छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, भुजबळांना कोणी काय सांगितले याची कल्पना मला नाही. एक-दोन दिवसात अंतिम यादी येईल, वेळ कमी आहे. गोडसे काय सगळ्यांचे म्हणणं आहे की, आम्हाला नाशिकची जागा मिळावी, असे त्यांनी म्हटले आहे. 


गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला 


शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. फडणवीसांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावर गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, जेव्हा निवडणुका जवळ येतील आणि निकाल समजतील तेव्हा अजून काय काय ते बोलतील. त्यांची मजल कुठपर्यंत जाईल ते सांगता येत नाही.  महाराष्ट्रात तुम्ही फार, एखादी दुसरी जागा निवडून येते का ते बघा. तुम्ही एवढ्या मोठ्या 4-5 जणांच्या पक्षाचे प्रमुख आहात. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करा.  तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ आता लोकांवर आली आहे, असा टोला त्यांनी लगावला.