Girish Mahajan नाशिक : निकाल येण्याआधीच न्यायालयावर टीका करणे चुकीचे आहे. संजय राऊतांचा (Sanjay Raut) हा स्वभाव झालेला आहे. ईडीच्या बाबतीत तेच, न्यायालयाच्या बाबतीत तेच, निवडणूक आयोगाच्या बाबतीतही तेच मत आहे. प्रत्येक वेळेला निकाल आमच्या बाजूने द्या मग न्यायालय बरोबर काम करताय, नाही दिला तर आमच्या विरोधात काम करतंय, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या बोलण्याला कुणीही महत्व देत नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 


नाशिक (Nashik) येथे पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन (Girish Mahajan) बोलत होते. ते म्हणाले की, तुमच्याकडे साधे 10 आमदारही शिल्लक नाहीत. तुमच्याकडे चिन्ह राहिलेले नाही. पक्षाचे नावही राहिले नाही. तरीदेखील तुम्ही म्हणता आमचाच पक्ष, आमच्याच बाजूने निर्णय द्या, असा करून चालणार नाही. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. हे राज्य कायद्याने चालते. 


त्यांच्याकडे आता काही शिल्लकच नाही


उद्धव ठाकरेंच्या विधानावर गिरीश महाजन म्हणाले की, राहुल नार्वेकर हे विधान सभेचे अध्यक्ष आहेत. दैनंदिन कामासाठी त्यांना बोलाव लागत. सरकारशी संवाद साधावा लागतो. भेटीचा आणि निकालाचा कुठलाही संबंध नाही. त्यांना सध्या समोर अंधार दिसत आहे. त्यामुळे अशा टीका करायच्या. त्यांची आता मानसिकताच तयार झाली आहे, कारण त्यांच्याकडे आता काही शिल्लकच नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना लगावला आहे. 


मोदी राज्यात येणार हा योगायोग


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राज्यात येणार हा योगायोग आहे. मोदी जल्लोष करण्यासाठी येत आहेत का? तुम्ही मोदींचा संबंध इथे का लावतात, स्वतःला एवढे मोठे का समजतात? अतिशय बालिश वक्तव्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करत असल्याचा चिमटा गिरीश महाजन यांनी यावेळी काढला. 


लवकरच गोड बातमी मिळेल


ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार आहेत. ते रामकुंडावर जाऊन जलपूजन करणार आहेत. रोड शो देखील करणार आहेत. देशभरात धार्मिक तीर्थक्षेत्रचा विकास होतोय, त्याच धर्तीवर नाशिक आणि त्रंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याची आमची मागणी आहे, लवकरच गोड बातमी मिळेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


राहुल गांधींना पंतप्रधान करणार का?


लोकसभेत 48 जागा आम्ही जिंकणार, ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही हे मी पुन्हा सांगतोय. मोदींचा करिश्मा आहे, समोर उमेदवार कोण आहे? राहुल गांधींना पंतप्रधान करणार का? त्यांनी जनमत समजून घ्यावे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


आणखी वाचा


Shiv Sena : कुणीही अपात्र ठरणार नाही, कुणाच्याच विरोधात निकाल लागणार नाही, पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता; एबीपी माझाला सूत्रांची माहिती