नाशिक : आजपासून गणेशोत्सवास (Ganeshotsav 2024) प्रारंभ झाला आहे. राज्यभरातील अनेक गणपती मंडळांत, घराघरांत लाडक्या गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) वाजत गाजत स्वागत होत आहे. तर दुसरीकडे धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील (Godavari Express) गणेशोत्सवाची 27 वर्षांची परंपरा यंदा खंडित झाली आहे. धावत्या रेल्वेत गणेश मूर्ती स्थापना करण्यास रेल्वे (Railway) प्रशासनाने विरोध केला आहे.  


राज्यभरात गणेशोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. सकाळपासून घरगुती गणपतीचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे राज्याच्या विविध भागात पाऊस पडत असताना दुसरीकडे भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तर गोदावरी एक्स्प्रेसमध्ये यंदा गणेश मूर्तीची स्थापना न झाल्याने सर्वधर्मीय चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


27 वर्षांची परंपरा खंडित 


'गोदावरीचा राजा' (Godavaricha Raja) अशी मनमाड -मुंबई या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रतिष्ठापना होणाऱ्या गणपतीची ओळख आहे. मात्र, यावर्षी प्रवाशी संघटनेने प्रयत्न करूनही धावत्या रेल्वेत गणेश स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केल्याने धावत्या रेल्वेतील बाप्पांचा प्रवास थांबणार आहे. गेल्या 27 वर्षांची परंपरा यंदा खंडित झाल्याने गणेशभक्त आणि चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


'गोदावरीच्या राजा'ला यंदा ब्रेक


मनमाड, लासलगाव आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील चाकरमाने हे गेल्या 27 वर्षांपासून मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसच्या धावत्या प्रवासी रेल्वे गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करून दहा दिवस पूजा-आरती करण्यात येत होती. यंदा मात्र या परंपरेला रेल्वे प्रशासनाने ब्रेक लावला आहे.


गणरायाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज 


दरम्यान, गणरायाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले असून, मुहूर्तावर गणरायाची स्थापना करण्यासाठी भक्तांची कालपासूनच लगबग सुरू आहे. काल बाजारपेठेत भक्तांची गणेशमूर्ती पसंत करण्याबरोबरच सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रात्री उशिरापर्यंत भक्तांची मोठी गर्दी शहराच्या विविध भागात होती. आज सकाळपासून लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी नाशिककरांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणाही पुरेशी काळजी घेत असून, तगडा बंदोबस्त या काळात राहणार आहे. गणेश स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत बंदोबस्त तैनात राहणार आहे. पोलीस आयुक्त 1, उपायुक्त 4, सहायक पोलीस आयुक्त 7, पोलीस निरीक्षक 200. पोलीस कर्मचारी 3000, होमगार्ड - 1400, एसआरपीएफ 3 प्लाटून, जलद प्रतिसाद दल 2 नियंत्रण पथक 2 प्लाटून, बीडीडीएस 1 पथक, प्लाटून.. दंगा नवप्रविष्ट पोलीस 72, दामिनी पथक 4, निर्भया मोबाइल 1 या प्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Weather Update: गणरायाच्या स्वागताला वरुणराजा लावणार हजेरी, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी