नाशिक : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki bahin yoajana) सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली. या योजनेच्या घोषणेनंतरच महिलांनी बँक आणि सेतू, तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. या कार्यालयाबाहेर असलेल्या एजंटशी संपर्क साधत ही योजना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र, या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवरुन अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे, शासन व प्रशासनाकडून नागरिकांना व लाडक्या बहिणींना महत्त्वाचं आवाहन करण्यात येत आहे. या योजनेसाठी नव्याने बँकेत खातं उघडण्याची गरज नसून बँकेत कुठलेही डिपॉझिट भरू नये, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी (Collector) जलज शर्मा यांनी केलंय.
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांची सेतू कार्यालयासह इतर तहसील कार्यालयातही मोठी गर्दी होत आहे. ऑनलाइन संकेतस्थळावर योजनेची माहिती भरण्यासाठी पर्याय येत नसल्याने लाभार्थी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे, कार्यालयीन स्तरावर या योजनेच्या कागदपत्रांवरुन गोंधळ उडत असून विविध अफवाही पसरल्या जात आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची अफवा देखील पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही, योजनेचे लाभ घेताना बँक खात्यात कुठलीही रक्कम डिपॉझिट करण्याची गरज नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व बँकांना आणि सेतू केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू केंद्रावर शासकीय अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या असून योजने संदर्भात कोणतेही पैसे देऊ नये आणि एजंट देखील आढळून आल्यास कडक कारवाईचे निर्देश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, महिलांना जुन्या बँक अकाऊंटवरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या जुन्या खात्याचं पासबुकचे झेरॉक्स द्यावे लागणार आहे.
पैसे मागितल्यास कारवाईचे आदेश - मुख्यमंत्री
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
अमरावतीत तलाठ्यावर निलंबनाची कारवाई
अमरावती जिल्ह्यातही सावंगी गावात लाभार्थ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे हा पैसे उकळत होता. प्रत्येक लाभार्थी महिलेकडून 50 रूपये लाच घेतली जात होती. हा प्रकार समोर आल्यावर तुळशीराम कंठाळेला निलंबित करण्यात आलं. माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मंडळ अधिकारी संजय मिरासे यांच्या फिर्यादीवरून वरुड पोलिसांनी केला गुन्हा दाखल करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता पन्नास रुपये मागितले होते.
बुलढाण्यात तलाठ्याची लाभार्थी महिलांशी अरेरावी
बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात खेर्डा इथे तलाठ्याने लाभार्थी महिलांशी अरेरावी केली. त्यानंतर हा तलाठी कार्यालय बंद करून गायब झाला. हे कार्यालय आजही न उघडल्याने नोंदणी ठप्प झालीय. अरेरावी करणारा काळे नावाचा तलाठी महिलांकडून 50 रूपयेही उकळत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर परभणीत चक्क नोंदणीसाठी तयार करण्यात आलेलं नारीशक्ती अॅपच चालत नसल्याचं उघड झालं. त्यामुळे आता नोंदणी करायची कशी असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे.