CM Eknath Shinde नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असे त्यांनी म्हटले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


आज नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते संजय शिरसाट उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.  


नाशिक, दिंडोरीचे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार


एकनाथ शिंदे म्हणाले की, नाशिकचे हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. भारती पवार असे महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा निर्धार नाशिककरांनी केला आहे. महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भर उन्हात इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.  यावरून आपण अंदाज लावू शकता की नाशिक आणि दिंडोरीत दोघेही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील.  


24 तास आमचे काम सुरु असते


जे काँग्रेसला करता आले नाही. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षात करून दाखवले आहे. या देशाला विकासाकडे नेण्याचे काम मोदींनी केलंय. महायुतीने देखील दोन वर्षात अनेक कामे केली आहेत. त्यामुळे मतदार आमच्या कामाची पोचपावती आम्हाला देतील.  निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुती काम करत नाही. 24 तास आमचे काम सुरु असते. निवडणुका असुद्या, किंवा नासुद्या, आम्ही आमचे काम 24 तास करतो, असे त्यांनी म्हटले आहे. 


देवेंद्रजी जे बोललेत त्यात वस्तूस्थिती


देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर एकनाथ शिंदे म्हणाले की, होय. त्यांच्या बोलण्यात सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे. आम्ही बाहेर गेलो तेव्हा ठाकरेंनी प्रयत्न केले. आम्हाला फोन आले. तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो. तुम्ही पुन्हा या. मात्र मी मुखमंत्री बनण्यासाठी हा निर्णय घेतला नव्हता. ज्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांची फारकत घेतली गेली. त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो होतो. मलाही निरोप दिला होता. दिल्लीला देखील त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की, यांना कशाला घेता आम्हीच येतो, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत येईल. मात्र तोपर्यंत त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. 50 लोकं माझ्यासोबत होते.  त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेत त्यात वस्तूस्थिती आहे. आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत. मात्र त्या मी बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 


संजीव नाईकांच्या नाराजीवर काय म्हणाले एकनाथ शिंदे? 


नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानंतर संजीव नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे लोक संजीव नाईक यांना भेटले आहेत. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. महायुतीचे काम ते सर्व लोक करतील. शेवटी आम्ही महायुतीचे लोक देशाच्या विकासासाठी काम करत आहोत. ही निवडणूक केवळ एका मतदारसंघाची नाही तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आहे. या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे. प्रत्येकाची इच्छा असतेच मात्र महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतात. हा आमचा अनुभव आहे. 


विरोधकांकडे आता कुठलेही काम उरलेले नाही


महायुतीची रॅली ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेरून येत होती. त्या वेळेस मशाल पेटवून डिवचण्याचे काम करण्यात आले अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे आता कुठलेही काम उरलेले नाही. शिव्याशाप आणि डिवचणे इतकेच काम त्यांच्याकडे उरलेले आहे. आम्ही काम करणारे लोकं आहोत आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे काहीच उरणार नाही. आता सरकार बदललेलं आहे हे अजून विरोधक मानायला तयार नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 


महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत


भुजबळ हे आता तुमच्यासोबत आहे. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरीची निवडणूक किती सोपी वाटते? अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे म्हणाले की, ते आमच्या मंत्री मंडळाचे सहकारी आहेत. जो पर्यंत तिकीट वाटप होत नाही. तोपर्यंत कार्यकर्त्याची निवडणुकीला उभे राहण्याची इच्छा असते.  परंतु महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत. एकदिलाने काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.  


आणखी वाचा 


'ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर', फडणवीसांनंतर संजय शिरसाटांचाही मोठा गौप्यस्फोट