Raj Thackeray On Rs 2000 Note : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोटबंदीसारखे (Note Ban) निर्णय देशाला परवडणारे नसतात, असं राज ठाकरे म्हणाले.
असं सरकार चालतं का? : राज ठाकरे
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा काल (19 मे) केली. यावर राज ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती. कधीही गोष्ट आणायची, कधीही बंद करायची, त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारे नसतात देशाला. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?"
2000 रुपयांची नोट चलनातून रद्द
2000 रुपयांची नोट (Rs 2000 notes) चलनातून रद्द करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतला आहे. मात्र, 2000 रुपयांच्या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, अशा नागरिकांना आरबीआयने नोटा बदलून देण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्याशिवाय, बँकांनाही ग्राहकांना एटीएम अथवा इतर मार्गाने 2000 रुपयांची नोट न देण्याचेही निर्देश दिले आहेत.
VIDEO : Raj Thackeray On 2000 Note : नोटबंदीसारखा निर्णय देशाला परवडणारा नाही : राज ठाकरे
राज ठाकरे यांचा नाशिक दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारपासून (19 मे) तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून काल संध्याकाळच्या सुमारास त्यांचं नाशकात आगमन झालं. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे काम नेतेमंडळी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. 19 ते 21 मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे ते संघटनात्मक आढावा घेणार आहेत. राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम 2012 ते 2017 सत्ता मिळाली होती. तसेच 2009 मध्ये नाशिकमधून तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळेच आता राज यांनी पुन्हा नाशिकमध्ये लक्ष घातल्याची चर्चा आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार