Balasaheb Thorat : धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी जाहीर केली. एकीकडे डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे मेळावे होत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याने ते या मेळाव्यांकडे पाठ फिरवत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे आज तडकाफडकी धुळे दौऱ्यावर आले.
बाळासाहेब थोरात यांनी नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर (Sham Saner) यांची भेट घेतली. कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असले तरी ते काँग्रेसचे विचारधारेसोबत कायम सोबत राहतील, असा विश्वास यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
उमेदवार बदलांच्या चर्चांना पूर्णविराम
तसेच श्याम सनेर यांना आगामी निवडणुकासंदर्भात काही आश्वासन देण्यात आली आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठींचा निर्णय ठाम असल्याच देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगत उमेदवार बदलाच्या सर्व चर्चांना बाळासाहेब थोरात यांनी पूर्णविराम दिला आहे.
नाराज श्याम सनेर काय निर्णय घेणार?
यावर काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपण अद्यापही आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे म्हणत, कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करणार असे मत व्यक्त केले आहे. आता श्याम सनेर नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळ्यात तिरंगी लढत
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre), महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र महा विकास आघाडीतील अंतर्गत धुसपुस आणि वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल, अशी चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या