Nashik : राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी (Ajit Pawar) नाशिक लोकसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली आहे. उद्या दुपारी 1 वाजता पुण्यात अजित पवार गटाची बैठक होणार असून, या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे. तर, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महायुतीत आधीच भाजप आणि शिंदे गटात नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतांना आता भुजबळांच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट आला आहे. 


कालपासून छगन भुजबळांचे व्हिडिओ नाशिकच्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. अशात आता अजित पवार गटाकडून छगन भुजबळांसह समीर भुजबळांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीत राष्ट्रवादीने साताऱ्यातील जागेवरील दावा सोडला असून, त्याबदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून भुजबळ कुटुंबातील सदस्याला नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या घडामोडींना वेग आल्याची माहिती मिळत आहे. यासाठी उद्या पुण्यात अजित पवार गटाची बैठक होणार असून, या बैठकीत छगन भुजबळ यांच्यासह नाशिकमधील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहे. 


भुजबळ कुटूंबाला उमेदवारी पाहीजे अशी माझी मागणी नाही : छगन भुजबळ 


दरम्यान या सर्व चर्चांवर बोलतांना भुजबळ म्हणाले की, “माझं नाव तुम्हीच चर्चेत आणले. पण याबाबत तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. काय रुसवे आहे, नाराजी आहे याबत गोषवारा घेतील. कोणी मुबंईमध्ये गेले मागणी केली, त्यामुळे गोषवारा घेतला जाईल. तसेच भुजबळ कुटूंबाला उमेदवारी पाहीजे अशी माझी मागणी नाही. साताऱ्याची जागा भाजपने घेतली असल्याने त्याबदल्यात राष्ट्रवादीला एक जागा मिळावी ही चर्चा खरी आहे. पण जागावाटपाबाबत प्रफुल्ल पटेल, अजित दादासोबत बैठक होत आहे. मात्र, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खाते असून, आमचा शाळेचा एक प्लॉट अडकला आहे. त्या संदर्भात त्यांची भेट घेतली असल्याचे भुजबळ म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आता माघार नाहीच! शांतीगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम