नाशिक : एकीकडे महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे छगन भुजबळांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळांची नाशिकमधील नांदगाव मनमाड विधानसभेतून उमेदवारीवर भाष्य केलं आहे. नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेवून जाण्यासाठी छगन भुजबळांनी समीर भुजबळांना शुभेच्छा दिल्या. पण त्यावर आता एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदगावमध्ये आमचे विद्यमान आमदार सुहास कांदे आहेत, त्यामुळे ही जागा शिवसेनेकडेच राहणार. आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर उचित होणार का? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी भुजबळांना विचारला आहे.
छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. समीर भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना छगन भुजबळ यांनी नांदगाव-मनमाड मतदारसंघाचा उल्लेख केला. मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी उदंड आयुष्य लाभो अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, समीर भुजबळ अनेक दिवसांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत.
काय म्हणाले छगन भुजबळ?
नाशिक जिल्ह्याच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही ते सक्षमपणे सांभाळत आले आहेत. त्यांची अभ्यासू व मेहनती वृत्ती, नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर कामाचा ठसा उमटविला आहे. आगामी काळातही ते अशाच पद्धतीने ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास आहे.
समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव -मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!
आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर?
छगन भुजबळांच्या या ट्वीटला उत्तर देताना शिवसेना नेते दादा भुसे यांनी म्हटलं आहे की, नांदगाव विधानसभेत सुहास कांदे आमदार आहेत. दावा करणं ठिक आहे, लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. मात्र नांदगावमध्ये शिवसेनेचा आमदार असल्यामुळे ती जागा आमचीच आहे. आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर उचित होणार का?
आधी छगन भुजबळांचे ट्वीट आणि त्यानंतर त्यावर दादा भुसे यांनी दिलेली प्रतिक्रिया, यामुळे नांदगाव मतदारसंघावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात वाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव मतदारसंघात अजय-अतुल यांच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून समीर भुजबळ नांदगावमध्ये शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा: