Chhagan Bhujbal : महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत राज्यात 32 जागा मिळतील, असा दावा केला जात आहे. या वरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महाविकास आघाडीला मिश्कील टोला लगावला आहे. उद्या ते म्हणतील आम्ही 48 जागा जिंकणार आहोत. आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार का? असे त्यांनी म्हटले आहे. 


नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर येवला येथील संपर्क कार्यालयात छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भविष्यात मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आमदार अशा कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती मला मान्य राहील. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याच्या वेळेस मी आधी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी अंबडमधील रलीमध्ये सहभागी झालो. मी लोकसभेसाठी काही तिकीट मागितले नव्हते. महायुतीत काही अडचणी असतील त्यामुळे मी माघार घेतली. मला जनतेने भरभरून दिले आहे. त्यामुळे मी समाधानी आहे, असे त्यांनी म्हटले. 


महाविकास आघाडीच्या दाव्याची भुजबळांनी उडवली खिल्ली


ते पुढे म्हणाले की, महायुतीला जास्त जागा मिळतील व  अबकी बार मोदी सरकार, इसमे मुझे कोई शक नही, मोदी सरकारही भारत वर्ष मै राज करेगी, असे विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीकडून राज्यात आम्हाला 32 जागा मिळतील, असा दावा केला जात आहे. यावरून भुजबळांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. ते म्हणाले की, उद्या ते म्हणतील आम्ही 48 जागा जिंकणार आहोत. आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार का? प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचे धैर्य वाढवण्यासाठी हे बोलतच असतो. लोकांना आकर्षित करण्यासाठी या गोष्टी बोलायच्या असतात. प्रत्यक्षात महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून येणार आहेत. मोदींचे सरकार दिल्लीत स्थापन होणार आहे, असे त्यांनी म्हटले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Girish Mahajan : छगन भुजबळ खरंच नाराज आहेत का? गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...


'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका