नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद आता आणखीन वाढला आहे. ‘नाशिकला लाल दिवा आहे... उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो’, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांना दिला होता. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. संजय राऊत यांनी नांदगाव मतदारसंघाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलावं लागेल, असं भुजबळ म्हणाले. यापुढे जिल्हा परिषद आणि इतर निवडणुका आहेत त्याला जावे की नाही हे त्यांना विचारावे लागेल. नांदगाव मध्ये मी जे काम केलं ते त्याना माहित नसावं, कारण त्यांना गल्लीपासून दिल्ली पर्यंत कामं करावं लागतं. त्या मुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी या मतदार संघात परत परत यावे.


शिवसेना खासदार संजय राऊत महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे सुंदर शिल्प तयार केले आहे. त्याला तडा जाऊ नये याची काळजी शिल्पकारानेच जास्त घ्यावी, असा अप्रत्यक्ष टोला भुजबळांनी राऊतांना लगावला. पाहुणचार देण्या-घेण्याची सवय आहे, आपली मराठी भाषा आहे. कोण कोणत्या आवजाच्या पट्टीत बोलतो हे बघितले पाहिजे. शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो असं म्हटलं हे मान्य, मात्र कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. मी आता बीड, नांदेडला होतो, तेव्हा लोक भेटले तुम्ही शिवसेनेची पहिली शाखा सुरू केली सांगत होते. आम्ही आव्हान झेलले म्हणून बाळासाहेबाना वाटलं असेल यांना पुढे न्यावं. मात्र वेळी संजय राऊत शिवसेनेत नव्हते, असं भुजबळ म्हणाले.


संजय राऊत राऊत यांनाही सामनाच संपादक ते खासदारपद काम केल्यानेच मिळाले आहे. तसेच काम आम्हीही केलं. सामनाची सुरुवात झाली तेव्हा फोटोमध्ये आम्ही दिसतो, त्यानंतर 6 ते 7 वर्षांनी राऊत सामनामध्ये आले असल्याचं भुजबळांनी सांगितले.



उद्या नांदगावला ही लाल दिवा मिळू शकतो...राऊतांचा छगन भुजबळांना इशारा


आता नाशिकला लाल दिवा आहे, उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो, असा इशारा रविवारी नांदगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊतांनी छगन भुजबळांना दिला. त्यामुळे तुम्ही नांदगाव मतदारसंघ जिंकण्याचा विचार आता सोडून द्या, असा इशाराच संजय राऊतांनी छगन भुजबळांना दिला असून शिवसेनेच्या पुण्याई मुळेच भुजबळ राजकारणात टिकून आहेत असा टोलाही संजय राऊतांनी छगन भुजबळांना लगावला आहे.