Chhagan Bhujbal and Manikrao Kokate : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (NDCC Bank) आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यात मतभेद दिसून आले आहेत. भुजबळ यांनी बँकेच्या अडचणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना जबाबदार धरत “या सोकॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली,” असा आरोप केला होता. आता त्यांच्या आरोपाला कृषिमंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज झालाय, असे त्यांनी म्हटले आहे. 

छगन भुजबळांचा आरोप

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (दि. 12) माध्यमांशी संवाद साधताना नाशिक जिल्हा बँकेबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, नाशिक जिल्हा बँक ही एकेकाळी महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. पण, सर्वपक्षीय सोकॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली, असा आरोप त्यांनी केला होता. 

बँकेची निवडणूक घेऊ नका : छगन भुजबळ 

भुजबळ पुढे म्हणाले होते की, म्हणून मी सातत्याने संबंधितांना सांगत असतो की, कृपा करून बँकेची निवडणूक घेऊ नका. ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांचे पोरं पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहायला तयार आहेत. ती बँक कधीच वरती येऊ शकणार नाही. बँकेत आता आलेले अनास्कर अतिशय हुशार मनुष्य आहेत. त्यांच्या कामात कुठेही हस्तक्षेप करता कामा नये. त्यांना त्यांचे काम करू द्यावे. बुडवायचे काम सर्व नेत्यांनी मिळून केलेलेच आहे. रिझर्व्ह बँकेची सुद्धा सतत नोटीस येत आहे. सगळ्यात मोठं नुकसान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले आहे. गरीब शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना काम करू द्यावे. त्यांना सहकार्य करावे. त्यांच्या कामात कुठलाही हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी म्हटले होते. 

नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?

भुजबळांच्या वक्तव्यावर माणिकराव कोकाटे म्हणाले की, निवडणुका घेऊ नये, या मताचा मी सुद्धा आहे. निवडणुका बँकेला परवडणाऱ्या नाहीत. पण सर्वपक्षीय नेत्यांनी बँक संपवली, असे आरोप चुकीचे आहेत. त्यांचा कुठेतरी गैरसमज झाला आहे, असे काहीही झालेले नाही. कुठल्याही राजकीय पुढार्‍याकडे बँकेचे कर्ज येणे नाही. बँक त्यांनी बुडवली, असे म्हणता येणार नाही. काही गोष्टीत चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक कर्ज वाटप झालेले आहे. कर्ज वसूल न झाल्याने बँक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी, यासाठी प्रशासक राहावा, ही माझी पण भावना आहे. त्यामुळे फार गैरसमज करण्याचे कारण नाही, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal: 'जयंत पाटील पदावरून पायउतार झाले असतील...', शरद पवारांच्या पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत छगन भुजबळांची प्रतिक्रिया