मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार झाल्याची माहिती आहे. तर  शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे, मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनरल बॉडी मीटिंग बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतची अनेकदा चर्चा रंगली होती, दरम्यान आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  जयंत पाटील पदावरून पाय उतार झाले असतील, त्याबाबतीत मला माहिती नाही, ही नवीनच बातमी आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. १० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य करताना त्यांनी पक्ष नेतृत्वाला नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन केले.जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, “मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा. पवार साहेबांनी मला खूप संधी दिल्या. मी सात वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ आली आहे. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे आणि त्यासाठी नव्या उर्जेची गरज आहे.”

निलेश लंके यांची प्रतिक्रिया

पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याबाबत मला माध्यमांकडून माहिती समजली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव समोर येतं याबाबत मला कोणतीही माहिती नाही. प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा सर्वस्वी अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे. पक्षात कोणती जबाबदारी मिळो न मिळो मात्र पक्षासाठी काम करणं अत्यंत गरजेचे आहे. अडचणीच्या काळात पक्ष वाढीसाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते पक्षात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे, असंही लंकेंनी म्हटलं आहे.

शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील बातमी सोमर येताच शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील  आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे पुढं म्हणाले, आणखी कुणाची नावं चर्चेत आहेत याबद्दल कल्पना नाही. मला तुमच्याकडून कळलेलं आहे. संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला काम केल, पक्ष संघटना बांधली आहे. आज पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. त्यावेळेला निश्चितपणानं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं नेतृत्व पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. जयंत पाटील यांच्या सारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही, पक्षाची बैठक आहे एवढाच निरोप आलेला आहे. निर्णय काय होईल तो होईल, पक्ष बांधण्याच्यासाठी संघर्षात आम्ही  एकजुटीनं, एकोप्यानं उभं राहू, साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न 100 टक्के करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले.