Trimbakeshwar Temple : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) आता भाविकांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळणार आहे. गुढी पाडव्याचे (Gudi Padwa) औचित्य साधून आजपासून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून प्रसादाच्या लाडू वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या निर्णयाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

तिरुपती बालाजी, पंढरपूर, शिर्डी संस्थानप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील भाविकांना प्रसादाचे बुंदीचे लाडू मिळणार आहेत. अल्प दारात भाविकांसाठी प्रसादाचे लाडू उपलब्ध करण्यात आले आहेत. आज पासून लाडू वाटपास सुरुवात करण्यात आली असून देवस्थान ट्रस्टच्या निर्णयाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटात लाडूचे तब्बल 500 बॉक्स संपल्याचे दिसून आले. 

नेमकं काय म्हणाले देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त?

याबाबत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील शेलार म्हणाले की, गुढीपाडव्यानिमित्त आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे प्रसादाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. तिरुपती बालाजी सह अनेक मंदिरांमध्ये भाविकांना अल्प दरात प्रसाद दिला जातो. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळांनी एकजुटीने निर्णय केला की, त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अल्प दरात प्रसाद उपलब्ध करून दिला पाहिजे. आज पाडव्यानिमित्त त्याची सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दहा मिनिटात सर्व प्रसाद संपला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. यावेळी, येथील तिर्थक्षेत्राची पाहणी करुन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे, भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येत असतात. म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला देखील शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत अ वर्ग दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र 'अ' दर्जा देण्यास नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?

Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा