Kumbh Mela 2027 : आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या (Kumbh Mela 2027) नियोजनासंदर्भात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत साधू महंतांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गोदावरी वाहती पाहीजे, गोदावरी जिथे बंदिस्त आहे तिथे, गोदावरी खुली करा. आमची निराशा करू नका, ज्या व्यावसायिकांचे स्थलांतर केले जाईल, त्यांचे पुनर्वसन केले जावे. आम्ही कुंभमेळ्यात शाही स्नान शहरापासून दूर करणार आहोत. कुशावर्त तीर्थक्षेत्रावर आम्ही जाणार नाही. प्रयागराज प्रमाणेच कुंभमेळ्याचे क्षेत्र मोठे करा. 60 किलोमीटरपर्यंत घाटावर स्नानाची व्यवस्था करा, अशा मागण्या साधूंनी गिरीश महाजन यांच्याकडे केल्या.  यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे. 

गिरीश महाजन म्हणाले की, मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत गर्दी वाढणार आहे. आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कुशावर्त तीर्थक्षेत्र छोटे आहे, तिथे एवढे साधू कसे स्नान करणार? याची चिंता होती. मात्र आता मोठा निर्णय घेतला आहे. कुशावर्त तीर्थाच्या साधूंचे स्नान बाहेर करू, हा मोठा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वरला देशभरातून भाविक येतात. मात्र इथे गोदावरी कुठे आहे, पाणी कुठे आहे? हा प्रश्न पडतो. गोदावरी पवित्र असून ही येथे प्रदूषण आहे. नाशिकमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. गोदावरी पुनर्जीवित केली जाणार आहे. 12 महिने गोदावरी वाहील, अशी तयारी करू, यासाठी एखादा धरण बांधावे लागले तरी बांधू, असे मुख्यमंत्रीची भूमिका असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मी कुंभमेळ्याच्या निमित्ताने बैठक घेत आहे. सर्व आखाड्याचे प्रमुख बैठकीत आहेत. प्रयागराजमधील गर्दी बघितल्यावर 3 ते 4 पट गर्दी होईल. कुठे दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेत आहोत. मोठा  ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. लाखो भाविक कुशावर्तमध्ये स्नान करण्यासाठी येतात. पण तिथली जागा खूप छोटी आहे. गर्दी बघता तिथे स्नान करणे शक्य नाही. साधूंचे  स्नान करण्यासाठी कुशावर्त तीर्थासारखे पवित्र कुंड तयार करणार आहे. दीड वर्षात तिथे नवीन कुंड तयार केला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. 

गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास

गोदावरीचे नाव आहे. पण, गोदावरी दिसत नाही. इथे 5 ते 6 कुंड आहे, एखादे छोटे धरण बांधून गोदावरी नदी प्रवाहित राहण्यासाठी प्रयत्न करू. त्र्यंबकेश्वरमधून वाहणारी गोदावरी नदी सिमेंट काँक्रिटने बंदिस्त झाली आहे. त्यावरचे स्लॅब काढून टाकले जातील. गोदावरी नदी खुली केली जाईल. त्र्यंबकेश्वर शहरातून गोदावरी नदी वाहणार आहे. जे व्यावसायिक आहेत, त्यांची व्यवस्था करू. येत्या काही दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे देखील गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. 

कुंभमेळा नामकरण वादावर महाजनांचं मोठं वक्तव्य 

दरम्यान, कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? यावरून नाशिक आणि त्र्यंबकमधील साधू-संतांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर देखील गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही स्थान महत्त्वाचे आहेत.  नाशिक-त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावाने कुंभमेळ्याचे नामकरण केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय