नाशिक : शरद पवार खोट्या माहितीच्या आधारे कांगावा करत आहेत, त्यामुळे मी भोसले नसल्याचा एक तरी पुरावा द्या, नाहीतर माफी मागा, असे आव्हान तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे. काल शरद पवार यांनी केलेल्या नावाबाबतच्या प्रश्नांवर भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.
आज तुषार भोसले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्या प्रश्नांवर उत्तर दिले आहे. काल शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत असताना पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना म्हणाले होते की, संभाजी भिडे, तुषार भोसले यांची नावे आधी तपासून घ्या, शाळेत जाऊन या नावांबाबत विचारणा करा, ही नाव बदललेली माणसे आहेत. या टीकेवर तुषार भोसले यांनी सडेतोड उत्तर देत पवारांनाच आव्हान दिले आहे.
तुषार भोसले यावेळी म्हणाले की, शरद पवार हे देशाचे मोठे नेते असून माझा समज होता की, एखादे वक्तव्य करताना ते खात्री करतात. पण काल माझा गैरसमज दूर झाला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझे आडनाव भोसले नसल्याचे व्हायरल होत होते. माझ्या मनात याचा मास्टरमाईंड कोण, याचा शोध होता. काल एकादशीच्या दिवशी याचा मास्टर माईंड शरद पवार असल्याचे समजले, असा घणाघात भोसले यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आम्ही जे धार्मिक काम सुरू केले आहे. तुम्ही तात्विक विरोध करू शकत नाही, म्हणून तुम्ही जातीचे शस्त्र काढले. शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला उत्तर देण्यासाठी आज पुरावे आणले आहे. शाळा सोडल्याचा दाखला आणला असून यात स्पष्ट लिहले आहे की, भोसले माझे आडनाव आहे. धर्म आणि जात मराठा असून डंके की चोट पे, सांगतो मी मराठा असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
मी अमळनेरचा, तुमच्या नेत्यांना विचारा
तसेच मी अमळनेरचा असून संपूर्ण अमळनेर गाव हे एकाच भोसले कुळाचे आहे. आमच्याच गावचे चिरंजीव रणजित भोसले हे तुमच्या पक्षाचे स्थानिक नेते आहे. आज मला आश्चर्य वाटतं की, ज्येष्ठ नेते शरद पवार खोट्या माहितीनुसार आधारे कांगावा करत आहे. त्यामुळे मी भोसले नसल्याचा एक तरी पुरावा द्या, नाहीतर माफी मागा, असे आव्हान तुषार भोसले यांनी शरद पवार यांना दिले आहे. तसेच मी हे सगळे पुरावे सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवणार असल्याचे ते म्हणाले.
जातीपातीचे राजकारण सुरू
शरद पवार कितीही पुरोगामी पणाचा आव आणत असले, तरी ते जातीवादी असल्याचे काल स्पष्ट झाले. आमच्या धार्मिक कार्याला ते धास्तावले असून, त्यांनी जातीपातीचे राजकारण सुरू केलं आहे. किमान आठ दिवसांत त्यांनी माफी मागावी. त्यांनी जर माफी मागितली नाही, तर स्पष्ट होईल, की एवढा मोठा नेता 32 वर्षाच्या कार्यकर्त्यासोबत कसे वागत आहे? असा सवालही तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे.
ही बातमी वाचा: