नाशिक : मुंबई नाका परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Camp) नेते माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांचे जनसंपर्क कार्यालयावर काल महापालिकेने (Nashik NMC) कारवाई केली. यानंतर वसंत गिते यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही कारवाई केली असून महापालिकेच्या आयुक्तांनीदेखील याबाबत स्पष्ट संकेत दिल्याचा दावा त्यांनी केला. आता यावरून देवयानी फरांदे यांनी वसंत गिते यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, त्यांनी महत्वाचे सांगितले की, चाळीस वर्षांपासून हे ऑफिस होते. ती नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडची जागा आहे. त्या जागेवर 40 वर्षापासून ऑफिस होते. या अतिक्रमण मोहिमेशी माझा कुठलाही संबंध नव्हता. डीपी रोडवर 40 वर्षापासून अतिक्रमण होतं. अतिक्रमण मोहीम राबवताना महापालिकेला खूप त्रास झाला. महापालिकेने अतिक्रमण काढले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला आहे, असे त्यांनी म्हटले.
चाळीस वर्षे अतिक्रमण करणे अतिशय गंभीर
देवयानी फरांदे पुढे म्हणाल्या की, त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा चालवतात, तो देखील उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस कर्मचारी देखील होते. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. महापौर, उपमहापौर, आमदार, अशी पद भूषवलेल्या व्यक्तीने महापालिकेच्या डीपी रोडवर चाळीस वर्षे अतिक्रमण करणे अतिशय गंभीर आहे, असे पलटवार त्यांनी यावेळी केला आहे.
त्यांच्याकडून व्याजासह भाडे घ्यावे
मी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करेल की, काल मोहीम राबवताना झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. चाळीस वर्षे त्यांनी महापालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडून व्याजासह भाडे महापालिकेने घ्यावे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा कलंक आहे. अतिक्रमण मी काढलेले नाही. मला अतिक्रमण काढायचं असतं मी दहा वर्षांपूर्वी काढले असते. त्या भागातील अनेक लोकांच्या तक्रारी नाशिक महापालिकेकडे होत्या. नाशिक महापालिकेने गुंडशाहीला घाबरून त्या ठिकाणी आतापर्यंत कारवाई केली नव्हती, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे
नाशिकमधील ड्रग्ज पेडलरवर माझ्यामुळे कारवाई केली. सभागृहात मी प्रश्न उपस्थित केले होते. दारूचे आणि जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे. चांगल्या व्यक्तीने आरोप केले असते तर मी त्याची दखल घेतली असती. अतिक्रमण करून डीपी रोडपासून वंचित ठेवल्याने त्या भागातील नागरिकांची माफी मागावी. आपण आमदार, महापौर झाला. आपला मुलगा उपमहापौर झाला. या ठिकाणी ऑफिस टाकू शकतो. कोणी काही करू शकत नाही, असे आव्हान महापालिकेला त्यांनी दिलं होतं. ते माझ्या पाठीमागे कायम मला त्रास देण्याचे काम करत असतात. महिला रुग्णालय मंजूर करून आणले, त्याला देखील विरोध केला, असे असंख्य विषय आहेत, असा पलटवार त्यांनी यावेळी केला आहे.
...तर इथून पुढे मला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल
मी सूडबुद्धीने काम करत नाही. जर ते माझं नाव घेत असतील तर इथून पुढे मला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. त्यांच्या दबावामुळे नाशिक महापालिका 40 वर्ष कारवाई करू शकली नाही. मी अधिवेशनात व्यस्त होते. सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण मोहीम जरी झाली असली तरी नागरिकांनी त्याचं स्वागत केलं आहे. मी आरोप करत नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त झाला आहे, असेही देवयानी फरांदे यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा