Devendra Fadnavis नाशिक : सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना आहे. आपल्याला धनुष्य उचलायचे आहे, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. आज मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या (Dindori Lok Sabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारती पवारांना मोठे मताधिक्य द्या. नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहे ते सर्व मार्गी लावण्याचे काम मी करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी केले. पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे आणायचे आहे. त्यासाठी 60 ते 70 हजार कोटी रुपयांचे नियोजन आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्वांचा पाणी प्रश्न मिटवायचे आहे.
एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना
सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना आहे. आपल्याला धनुष्य उचलायचे आहे. एकीकडे मोदींची सेना, एकनाथ शिंदेंची सेना, अजित पवारांची सेना, राज ठाकरेंची सेना अनेक संघटना मिळून आपली महायुती तयार आहे. दुसरीकडे राहुल गांधीची 24 पक्षांची खिचडी आहे. राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. संगीत खुर्चीसारखे पंतप्रधान हे 24 पक्ष बदलणार आहे.
ठाकरे-पवारांवर टीका
देशाला सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान निवडायचा आहे. आपल्या विकासाच्या गाडीचे इंजिन मोदी आहे. या गाडीला वेगवेगळे नेते डबे जोडले आहे. सर्वांना घेवून विकासाची गाडी ही पुढे सुरू आहे. दुसरीकडे राहुल गांधी, शरद पवार, मायावती हे सगळेच म्हणतात आम्ही इंजिन आहे. त्यांच्या गाडीला डबेच नाही. सोनिया गांधींच्या इंजिनमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी आहेत. शरद पवार यांच्या इंजिनात सुप्रिया सुळेंसाठी जागा आहे. उध्दव ठाकरे यांच्या इंजिनात आदित्य ठाकरे यांची जागा आहे. सर्वसामान्यांना यांच्या गाडीत जागा नाही.
कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरण राबवविणार
मोदींनी देशात अनेक योजना राबविल्या आहेत. मोफत रेशन मोदींच्या माध्यमांतून मिळत आहे. मुद्रा लोन मोदींच्या माध्यमातून देण्यात आले. दहा कोटी महिलांना मोदींनी रोजगार मिळवून दिला. मोदींनी अनेक योजना आणल्या आहेत. प्रत्येकाच्या घरावर सोलर लागणार आहेत. 300 युनिट मोफत तयार होणार आहे. शेतकरी सन्मान निधी, शेतमाल उद्योग प्रक्रिया दिली आहे. कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरण राबविणार आहे. मनमाड शहरासाठी बायपास मंजुरीसाठी प्रस्ताव द्या, अशी मागणी सुहास कांदेंनी केली. त्यांना मी आश्वासन देतो की, लगेचच बायपास मोदीजींकडून मंजूर करून घेऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले.
100 देश म्हणताय की आमचे नेते नरेंद्र मोदी
विकास करणारे मोदीजी आहेत. भारताला मजबूत करणारे मोदीजी आहेत. कोविड काळात लोक मरत होते, त्यावेळी मोदींनी कोविडची लस तयार करण्यासाठी रॉ मटेरियल दिले. 140 कोटी जनतेला मोदींनी लस उपलब्ध करून दिली. मॉरिशसला गेलो तेव्हा तेथील लोकांनी मोदींचे आभार मानले. जगाच्या पाठीवरील 100 देश म्हणत आहेत की आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत. देशाला मोदीजींचे सक्षम नेतृत्व मिळाले आहे. आज देश सुरक्षित आहे.
मोदी बाप बनून बसलेत
पूर्वी देशात अनेक बॉम्बस्फोट व्हायचे तेव्हा देशाचे पंतप्रधान मूग गिळून बसायचे. तेव्हा लाचारी बाळगून अमेरिकेत जायचे. मात्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले. त्यानंतर आजतागायत बॉम्बस्फोट झाले नाही. कारण मोदी बाप बनून बसले आहे. आज पाकिस्तान आपल्याला घाबरतोय. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला परिणामी भारताला मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा