Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांची (Lord Shri Ram) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजेचा अंश अध्योध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य पूजेत सामील केला जाणार आहे, अशी माहिती नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी आणि महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे.
यावेळी सुधीरदास महाराज म्हणाले की, अतिशय अलौकिक आणि दिव्य अशी अनुभूती होत आहे. आज अयोध्या नगरी अत्यंत सुंदर अशी सजली आहे. आमचा २७ पिढ्यांचा भाग असलेले पुरुषसुक्त पूजन हे अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य पूजेत समाविष्ट करण्यात आल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
आतापर्यंत झाले 'हे' विधी
ते पुढे म्हणाले की, गुरुवारपासून राम मंदिराच्या विधींना सुरुवात झाली आहे. प्रायश्चित्त विधी, गणेश पूजन, पुण्यवाचन झाले आहे. आता मंदिर स्थापनेचा विधी सुरु झालेला आहे. भारतातील १२१ ब्रम्हवृंद या निमिताने अयोध्येत दाखल झाले आहेत. संपूर्ण अयोध्येत राममय वातावरण झाले आहे.
काळाराम मंदिरातील पुजेपासून पंतप्रधान मोदींच्या व्रताला सुरुवात
पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी तुम्ही पूजा केली याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन ११ दिवसांच्या व्रताचा संकल्प केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ दिवस उपवास करणार आहेत. काळाराम मंदिराच्या पूजेपासून त्यांच्या व्रताला सुरुवात झाली.अयोध्येतील राम मंदिराची पूजा झाली की त्यांचे व्रत पूर्ण होणार आहे, असे सुधीरदास पुजारी म्हणाले.
नाशिककरांसाठी मोठा भाग्याचा दिवस
नाशिककरांसाठी हा मोठा भाग्याचा दिवस आहे. कारण प्रधान पौरोहित्य नाशिकचे दोन पंडित दीक्षित गुरुजी आणि द्रविड गुरुजी हे करत आहेत. नाशिकचे श्रीधर शास्त्री वारे आणि आण्णा शास्त्री वारे यांचा कर्मकांड प्रदीप नावाचा ग्रंथ आहे. त्यात शिखर प्रतिष्ठा हा स्वतंत्र विधी नसून तर तो समाविष्टच विधी आहे, असा शास्त्रार्थ दिला असून नाशिकचे पंडित तोच शास्त्रार्थ देत आहेत. हा नाशिककरांसाठी मोठा आनंदाचा क्षण आहे.
काळारामाच्या पूजेचा अंश अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत
नाशिकच्या काळाराम मंदिरात जी पूजा होते ते पुरुष सूक्ताच्या षोडशोपचार पूजेने होते. त्यानुसार हिंदू धर्मात षोडशोपचार पूजा सुरु झाली आहे. तीच पूजा नाशिकच्या काळाराम मंदिरात होते आणि आता तीच पूजा अयोध्येतील राम मंदिरातही होणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा