नाशिक : बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता संजय राऊत यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.  


संजय राऊत म्हणाले की, शंका घ्यावी असेच हे प्रकरण आहे. मुंबई किंवा देशभरातील कुठलंही एन्काऊंटर हे कधीही खरे नसते. त्यात काहीतरी रहस्य असतं. काहीतरी संपवायचं असतं. या प्रकरणात जेव्हा ही घटना घडली त्यावेळी बदलापुरातील जनता आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणत रस्त्यावर उतरली होती. त्यांनी रेल्वे बंद पाडली,  रस्ते ब्लॉक केले, मंत्र्यांना परत पाठवले होते. संपूर्ण राज्यात तणावाची परिस्थिती होती. आम्हाला आरोपी हातात द्या, आम्ही त्याला फासावर लटकवू किंवा शिक्षा देऊ, अशी लोकांची मागणी होती. तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितले की, असे करता येणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. आम्ही फास्टट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवू. या सगळ्या आंदोलकांवर त्यांनी कायदा हातात घेतलं म्हणून दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या अशी त्यांची मागणी होती. 


संडास साफ करणाऱ्या मुलाला गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कुणी दिलं?


यात आरोपी एक नव्हता. ज्याचा एन्काऊंटर केला तो आणि संस्थेचे चालक, संचालक असं मोठं एक सर्कल आहे. एन्काऊंटर खरं आहे का नाही हे जनतेला माहिती आहे. जनतेवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, त्याच्या हातात बेड्या आहेत. मग तो बंदूक घेऊन गोळ्या कसा चालवतो. संडास साफ करणारा मुलगा गोळ्या कसा चालवतो. संडास साफ करणाऱ्या मुलाला गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कुणी दिलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 


संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केले?


24 वर्षांचा मुलगा पोलिसांनी कमरेला लावलेली पिस्तुल हिसकावून घेतो. पिस्तुल लॉक असतं. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत. हे जे कोणी आहेत भाजपशी संबंधित संस्थाचालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं. संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केले? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी द्यावे. 


पोलीस एवढेच लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा


बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती. राज्यात अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलंय त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं आहे का?  हे साधे प्रकरण नाही. न्यायालयीन कोठडीला गुन्हेगार आहे ज्याचा खटला तुम्ही फास्टट्रॅक कोर्टात चालवणार आहात आणि त्याला फाशी देणार आहात. त्याचं तातडीने एन्काऊंटर करण्याची गरज का पडली? याचे उत्तर द्यावे. कोणी पळून जात नव्हते. पोलीस व्हॅनमध्ये बेड्याने जखडलेला गुन्हेगार, बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेवरील पिस्तुल कसं काढेल? एवढेच आमचे पोलीस लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 


एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल 


राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहे. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला? आरोपीने आपल्या जबावात काही खुलासे केले होते, म्हणून त्याचं एन्काऊंटर झालं. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय. दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल. सरन्यायाधीशांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचायसोबत चहा घेतला. मग कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या? अजित पवार यांच्या बाबत जी सुनावणी सुरू आहे तेच सरन्यायाधीश हास्यविनोद करतात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असेही संजय राऊत म्हणाले.