Nashik lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. 


नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतील इच्छुकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली. त्यानंतर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नाव अचानक चर्चेत आले. तर दुसरीकडे शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे महायुतीतून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांचे नाव पुढे आले नसल्याने त्यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. 


अजय बोरस्ते - शांतीगिरी महाराजांची भेट 


आता शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले अजय बोरस्ते यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली आहे. नाशिकच्या सिडको परिसरात सिद्धिविनायक मंदिरामध्ये अजय बोरस्ते आणि शांतीगिरी महाराज यांच्यात भेट झाली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


शांतीगिरी महाराजांनी महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद देण्याची विनंती


एका वाहनात बसून दोघांमध्ये झाली चर्चा झाली आहे. शांतीगिरी महाराजांनी महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद देण्याची विनंती अजय बोरस्ते यांनी केल्याचे समजते. याआधी अनेक नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद घेतले आहेत. मागील काळात शांतीगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही भेट घेतली होती. 


भाजपकडून महंत अनिकेत शास्त्री इच्छुक 


दरम्यान, महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, दोन दिवसांत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी भाजपकडून (BJP) निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरून आपल्या उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली असल्याचा दावा अनिकेत शास्त्री यांनी केला आहे. 


आणखी वाचा 


नाशिक भाजपमध्ये नाराजीनाट्य, भारती पवारांवर आरोप करत युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, त्याचवेळी पक्षाकडून हकालपट्टी