Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून जोरदार प्रचारदेखील केला जात आहे. तर दुसरीकडे महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. 


नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी अनेक वेळा ठाणेवारी केली आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील नाशिकच्या जागेसाठी जोर लावला आहे. तर भाजपकडून देखील या जागेवर दावा करण्यात आल्याने नाशिकचा गुंता आणखी वाढत चालला आहे. आता नाशिक लोकसभेच्या जागेबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. 


नाशिकची जागा शिवसेनेलाच


अलीकडेच शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमके काय झाले याबाबत अजय बोरस्ते यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.  


नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्री आग्रही


अजय बोरस्ते म्हणाले की, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. नाशिकच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिकची जागा शिवसेनेला सुटावी, यासाठी मुख्यमंत्री देखील आग्रही आहेत.  नाशिकची जागा आम्हाला सुटेल, असा विश्वास आहे. येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल, असा अंदाज आहे. नाशिकमध्ये धनुष्यबाणाचाच उमेदवार असेल, असे त्यांनी म्हटले आहे. 


नाशिकमध्ये कुठलाही उमेदवार असो, तो निवडून येणारच


ते पुढे म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठलाही उमेदवार असो, तो उमेदवार निवडून येणारच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) 400 पारचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 45 हून अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात आम्ही 45 प्लस जागा निवडून येऊ, असे अजय बोरस्ते म्हणाले. 


शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत 


शांतीगिरी महाराज हे महायुतीतून नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.  या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. मात्र त्यांचे नाव मागे पडले होते. आता शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान देखील केले आहे. 


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेचा तिढा सुटेना अन् छगन भुजबळ विदर्भात सभा गाजवणार, ओबीसींच्या मुद्द्यांवर डागणार तोफ!