मालेगाव : रेणुका सुत गिरणी कर्ज आणि फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांच्या जामीन अर्जावर आज मालेगावच्या न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायलयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे. हिरे यांना आता जेल की बेल याचा निर्णय, मंगळवारी कोर्ट सुनावणार आहे. 


अद्वय हिरे यांचे वकील व जिल्हा बँक तसेच सरकारी वकिलांनी आज जामीन अर्जावर दोन तास युक्तिवाद केला. दोन्ही युक्तिवाद ऐकून घेत न्यायालय जामीन अर्जावर उद्या ( 27 नोव्हेंबर ) निर्णय देणार आहे. दरम्यान, काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील, बेकायदेशीर झाल्या असतील तर त्याचा नक्कीच कोर्टाने विचार करावा. परंतु चौकशी पूर्ण झाली आहे. अनेक कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांचे जबाबही झाले आहेत. कागदपत्रे आणि प्रॉपर्टी पण शिज केल्या आहेत. पुढे काही आणखी चौकशीचा काही मुद्दाच शिल्लक राहिलेले नसल्याने अद्वय हिरे यांना न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून नक्की जामीन देईल असा आशावाद ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला.


नेमकं प्रकरण काय?


मालेगावच्या रेणुका सुत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांच्या विरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना भोपाळवरून अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या दोन्ही युक्तीवादानंतर बँकेला सुट्टी असल्याने कर्ज प्रकरणात बँकेचे इतिवृत्त तपासणे बाकी आहे , कर्ज प्रकरणी अजूनही काही लोकांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याचे कारण सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पुन्हा त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


आठ वर्ष जुनी केस


दरम्यान, बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप यापूर्वी अपूर्व हिरे यांनी केला होता.