Nashik News नाशिक : प्रत्येक जण नववर्षाचे (New Year 2024) स्वागत अत्यंत जल्लोषात करतो. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पार्ट्यांचे नियोजन करतात. हॉटेल्स, हिल्स, धरणालगत पार्ट्यांचे बरेच बेत आखले जातात. यावेळी मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन (Alcohol Consumption) केले जाते. मात्र पार्टीनंतर काही जण नशेच्या धुंदीत आपली वाहने चालवत असल्याने अनेकदा अपघाताला निमंत्रण होते. त्यामुळे थर्डी फर्स्टला (31st December) मद्यप्राशन करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची (Nashik Police) करडी नजर असणार आहे.


पोलीस प्रशासनातर्फे 31 डिसेंबरला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहराच्या तब्बल 75 ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण (Kirankumar Chavhan) यांनी दिली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाने 48 बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 2 हजार 500 पोलीस व अधिकारी यांच्यासह 500 होमगार्ड, आरसीपी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.  


असा असणार पोलिसांचा बंदोबस्त


शहर आयुक्तालय : 4 उपायुक्त, 7 सहाय्यक आयुक्त, 30 पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक, दीडशे पेक्षा जास्त उपनिरीक्षक, 2 हजार पोलीस कर्मचारी. 
ग्रामीण पोलीस : 2 अपर पोलीस अधीक्षक, 8 उपविभागीय अधिकारी, 40 पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक, दोनशेपेक्षा जास्त उपनिरीक्षक, दीड हजार पोलीस कर्मचारी 
अतिरिक्त : शहर व जिल्ह्यात आठशे होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक.


सीसीटीव्हींद्वारे शहरावर लक्ष


पोलिसांकडून (Nashik Police) शहराबाहेरून येणाऱ्या रस्त्यांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवरही पोलिसांनी नजर ठेवली आहे. सीसीटीव्हींमार्फत (CCTV) नियंत्रण कक्षातून शहरावर लक्ष ठेवले जात आहे.


ब्रेथ अ‍ॅनलायजरद्वारे तपासणी


मद्यपी चालकांवर अंकूश ठेवण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर (Breath Analyzer) मशीनमार्फत तपासणी केली जाणार असून पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जाणार आहे. रात्री ८ वाजेपासून पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. नाशिककरांनी नियम पाळून आनंद साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


...तर गुन्हे नोंदवणार


नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. शहरात पोलीस ठाण्यांसह वाहतूक पथकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाकाबंदी करून मद्यपींची तपासणी सध्या सुरु आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवले जातील, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिला आहे. 


आणखी वाचा