नाशिक : स्क्रॅप (Scrap) खरेदी करताना वजन काटे मालकांशी संगनमत करून वजनात फेरफार करीत उद्योजकाची (Businessman) कोट्यवधीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही वजनकाटे सील करण्यात आले आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत अरुण संगई (65, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. संगई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या 20 वर्षांपासून संशयित अभिषेक शर्मा (33) याचे संजीवनगर येथे स्क्रॅपचे दुकान आहे. त्याचे अंबड एमआयडीसीमधील महाराष्ट्र वे ब्रिज, जानकी वे ब्रिज व एक्स्लो पॉईंट, इंडस्ट्रियल वे ब्रिज या फर्मचे मालक यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे संशयित शर्मा याने तीनही वजनकाटे मालकांशी संगन्मत करून फिर्यादी यांची फसवणूक केली. संशयिताने संगई यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन इंडिया प्रा. लि., तसेच प्लॉट नंबर 6 वर असलेल्या ऊरजयंत इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीमधील स्क्रॅप मटेरियल वेळोवेळी खरेदी केले. 


स्क्रॅप मटेरियल कमी दाखवून फसवणूक


तसेच कंपन्यांमधून गाडीमध्ये स्क्रॅप भरल्यानंतर संशयित वजन काट्यांवर जाऊन बनावट पावत्या तसेच वजनामध्ये फेरफार करीत स्क्रॅप मटेरियल कमी दाखवून फसवणूक केली. एका स्क्रॅपच्या गाडीमध्ये तब्बल तीन ते चार टन वजन कमी दाखवले. दरम्यान कंपनी मालक संघई यांनी वजन काटा पावत्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित शर्मा यांच्या विरोधात फिर्याद दिली. 


तीन वजन काटे सील


त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संशयित शर्मा याने मागील वीस वर्षात संघई यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आल्याचे असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी वजनामध्ये फेरफार करणारे तीनही वजन काटे तत्काळ सील केल्याचे पोलिसांनी सांगितले.


मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता


औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या स्क्रॅप व्यावसायिकावर कोणाचा रायकीय वरदहस्त आहे ? या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेने सर्वच कंपनी व्यवसायिक जागृत झाले आहेत. त्यामुळे असे आणखी काही प्रकार समोर येण्याची शक्यता असून अजूनही मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.


आणखी वाचा


Palghar Crime : भाजीपाल्याच्या गाडीतून गांजाची तस्करी, लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघांना बेड्या